** मच्छिंद्र साळुंके
निफाड : एनजीएन न्यूज नेटवर्क
वाकद येथील आदिवासी कुटुंबातील चिमुरडीला हृदयाच्या झडपेस छिद्र असल्याने तातडीने उपचारांची गरज होती. मात्र शिधापत्रिका व आधारकार्ड नसल्याने तिच्या मोफत उपचारात अडथळा निर्माण झाला होता. अखेर निफाडचे तहसिलदार मा. विशाल नाईकवाडे यांनी संवेदनशीलता दाखवत आवश्यक कागदपत्रांची सोय करून दिल्यामुळे उपचाराचा मार्ग मोकळा झाला.
वाकद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पाहिलीत शिकणारी आदिवासी कुटुंबातील कु.वैष्णवी लहू दळवी या चिमुरडीला हृदयाच्या झडपेस छिद्र आहे. तिला आई – वडील नसल्याने ती बाळू काशिनाथ दळवी व नान्याबाई बाळू दळवी या वयोवृद्द आजी – आजोबा समवेत राहत आहे. तिच्या कुटुंबाची अंत्योदय शिधापत्रिका सन १९९८ मध्ये निर्गमित झाली होती. मात्र, शिधापत्रिका हरवली होती आणि तिची ऑनलाइन नोंदणी नव्हती. त्या कुटुंबाकडे कागदपत्रे करण्यास कुणी नसल्याने आधारकार्ड अभावी मोफत उपचारास चिमुरडी अपात्र ठरत होती. तिला आजार जास्त बळावल्याने गावातील नागरिकांनी तिला उपचारासाठी प्रवरानगर येथील रुग्णालयात दाखल केले मात्र, आधार अभावी शासकीय अनुदान मंजूर होण्याची शक्यता कमी असल्याने तेथील वैद्यकीय अधिकारी ऑपरेशन करण्यास धजावत नव्हते. त्यामुळे चिमुरडीचा जीव धोक्यात आला होता.
स्थानिक पत्रकार किरण आवारे यांना याबाबत कळले असता, त्यांनी निफाडचे तहसिलदार मा.विशाल नाईकवाडे यांच्याशी तातडीने संपर्क साधत चिमुरडीला आवश्यक त्या कागदपत्रासाठी मदतीचे आवाहन केले. याबाबत त्यांनी संवेदनशीलता दाखवत आवश्यक कागदपत्रे, तिला उपचारार्थ दाखल करण्याची तसेच संजय गांधी निराधार योजनेतून दरमहा आर्थिक मदत देण्याची तयारी दाखवली. त्यानंतर वाकद येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक वाळुंज यांनी तहसील कार्यालय गाठत तहसिलदार नाईकवाडे यांचे आदेशाने पुरवठा अधिकारी उल्हास टर्ले यांचे माध्यमातून आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून घेतले. या प्रयत्नांमुळे वैष्णवीच्या उपचारासाठी महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजनेचा लाभ मिळून तिच्या उपचाराचा मार्ग सुकर झाल्यामुळे वाळुंज यांनी तिला तातडीने उपचारार्थ नाशिक येथे हलवले व साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट मध्ये दाखल केले. त्यामुळे या चिमुरडीला चांगले उपचार मिळणार आहेत.
■ आदिवासी कुटुंबातील या चिमुरडीसारख्या गरजू मुलांना आधारकार्ड किंवा कागदपत्रांच्या अभावामुळे उपचार नाकारले जाणे ही दुःखद बाब आहे. शासकीय योजनांचा उद्देशच अशा गरजूंना जीवनदायी ठरणे हा आहे. त्यामुळे आमच्या कार्यालयाने तातडीने शिधापत्रिकेची खात्री करून आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून दिली. फक्त वैद्यकीय उपचारच नव्हे तर तिच्या भविष्यासाठी संजय गांधी निराधार योजनेतूनही नियमित आर्थिक मदतीची तरतूद केली जाईल. कोणतेही मूल उपचाराअभावी वंचित राहू नये, यासाठी प्रशासन संवेदनशीलपणे काम करत राहील.
- विशाल नाईकवाडे
तहसिलदार, निफाड
Comments are closed.