नांदगाव : एनजीएन न्यूज नेटवर्क
तालुक्यामध्ये तीन टप्प्यांमध्ये सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार असून त्यामध्ये शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत प्रभावीपणे राबविणार असल्याची माहिती नांदगाव तालुक्याचे तहसीलदार सुनील सौंदाणे यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये सर्व तालुक्यांमध्ये शिवार फेरी आयोजन करून शिव पानंद रस्त्यांचे सर्वेक्षण करणे आणि सीमांकन करणे व त्यासाठी ग्रामसभा आयोजित केली जाणार आहे.
दुसऱ्या टप्प्यामध्ये तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचे पट्टे वाटप करणे तसेच अतिक्रमण नियमाकुल केले जाणार आहेत. तर तिसऱ्या टप्प्यामध्ये स्मशानभूमी जागा ताबा देणे , रेशन कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड काढणे, संजय गांधी योजनेचा लाभ देणे व स्वच्छता मोहीम आयोजित केली जाणार आहे तसेच पोट खराबा प्रकरण लागवडीखाली आणण्यासंदर्भात कार्यवाही केली जाणार आहे. तरी तालुक्यातील सर्व नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार सुनील सौंदाणे यांनी केले.
Comments are closed.