प्रत्यक्ष मतदानाद्वारे निर्णय घेऊन वाद संपवण्याची सूचना
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
मराठा विद्या प्रसारक संस्थेमध्ये सत्ताधारी गटाकडून अभिमत विद्यापीठ स्थापन करण्याच्या उद्देशाने प्रयत्न सुरू असलेले दिसून येत आहे. त्याला विरोधक गटाकडूनही मोठ्या प्रमाणात विरोध होतोय. नुकत्याच पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या वादाचा गोंधळ संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे. या अनुषंगाने सत्ताधारी आणि विरोधकांनी संस्थेची होणारी बदनामी थांबवावी, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर यांनी केले आहे.
मराठा विद्या प्रसारक ही संस्था गोरगरीब विद्यार्थी कल्याणासाठी छत्रपती शाहू महाराज यांच्या दूरदृष्टीने आणि अनेक कर्मवीरांच्या अथक प्रयत्नातून स्थापन करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रात मोठ्या संस्थांमध्ये तिचा समावेश आहे. मात्र सध्याच्या संघर्षाने तिच्या लौकिकाला डंख मारला जात असल्याने वादग्रस्त मुद्दा बाजूला ठेवण्यात यावा. दोन्ही गटांनी एकत्र येऊन संस्था उज्ज्वल मार्गावर चालवण्यासाठी एकत्र येऊन प्रयत्न करावेत. खोट्या आरोप-प्रत्यारोपांऐवजी समजुतीने, शांततेने आणि सभ्यतेने मतदानाद्वारे निर्णय घेऊन हा वाद संपवावा.सोशल मीडियावरही एकमेकांविरुद्ध खोडसाळप्रकारे आरोप करत संस्थेची बदनामी करणे तात्काळ थांबवावे, असे आवाहनही गायकर यांनी केले आहे.
Comments are closed.