NGN News
Latest Marathi News

मंदिर २४ तास खुले, सीसीटीव्हीची नजर.. कालिका माता मंदिरात सुविधांचा जागर

२२ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर दरम्यान नवरात्रोत्सव ; भाविकांसह सेवेकऱ्यांचा विमा काढणार

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

आगामी शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या कालिका माता मंदिरामध्ये भाविकांना पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. संपूर्ण नवरात्रभर मंदिर चोवीस तास खुले राहणार असून भाविक सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यात येणार आहे. येत्या २२ सप्टेंबर पासून ६ ऑक्टोबर दरम्यान हा उत्सव सुरु होणार आहे.

यासंदर्भात संस्थांचे अध्यक्ष केशव अण्णा पाटील यांनी माहिती दिली. ते म्हणाले, नवरात्रोत्सवाच्या काळात हजारो नाशिककर भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. याशिवाय शेजारच्या धुळे, जळगाव, अहिल्यानगर येथील भाविकांचीही येथे मांदियाळी असते. त्यानुषंगाने नियोजन करण्यात येत आहे. भाविकांना निष्कंटक दर्शनाचा लाभ मिळावा, यास्तव विविध यंत्रणांच्या मदतीने नियोजन सुरु आहे. या काळात मंदिर चोवीस तास खुले राहील. विशेष म्हणजे यंदाचा कालिका उत्सव घटस्थापना ते कोजागिरी पौर्णिमा असा सुरु राहणार आहे.

यासंदर्भात झालेल्या तयारी आढावा बैठकीला मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वपोनि संतोष नरुटे, मंदिर देवस्थानचे सचिव प्रताप कोठावळे, कोषाध्यक्ष सुभाष तळाजिया, विश्वस्त आबा पवार, दत्ता पाटील, किशोर कोठावळे आदि उपस्थित होते.

भाविकांचा दोन कोटींचा विमा काढणार..

कालिका माता मंदिरामध्ये भाविकांची या काळात प्रचंड प्रमाणात गर्दी होते. त्या अनुषंगाने सर्व भाविकांचा दोन कोटींचा सामुहिक विमा काढण्यात येणार आहे. देवीच्या दागिन्यांसाठी एक कोटीचा विमा काढण्यात येणार असून सेवेकरी चमूसाठीही विमा कवच प्रदान करण्यात येणार आहे. दरोज पहाटे ३.३० वाजता काकडारती होई; तर रात्री १२.३० वाजता महाआरती करण्यात येईल, अशी माहिती पाटील यांनी दिली.

६० सीसीटीव्हीची नजर ..

या काळात भाविकांची होणारी लक्षणीय गर्दी लक्षात घेता सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी तब्बल ६० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. याशिवाय मंदिर संस्थानाने स्वत:ची सुरक्षा यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. महिला आणि पुरुष बाऊन्सर तैनात करण्यात येणार आहेत. दर्शनासाठी महिला आणि पुरुषांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे.

तत्काळ दर्शन सुविधा..

नवरात्रोत्सवात नागरी सुरक्षा दल, होमगार्ड, पोलीस, अग्निशमन सेवा, जनरेटर आदी २४ तास तैनात करण्यात येणार आहेत. परिसरात स्वच्छता ठेवण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार असून त्यासाठी प्रत्येकी शंभर पुरुष आणि महिला स्वयंसेवक ठेवण्यात येतील. आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उभारून रुग्णवाहिका सुविधा बहाल करण्यात येणार असल्याचे पाटील म्हणाले. भाविक सुविधेपोटी ‘देणगी दर्शन’ म्हणजेच तत्काळ दर्शन सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. दिव्यांग आणि वृध्द भाविकांना व्हीलचेअर सुविधा उपलब्ध राहणार आहे. परिसरातील दुकानदारांना प्लास्टिकबंदी धोरणाचे तंतोतंत पालन करावयास सांगण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.

Comments are closed.