नाशिकमधील आक्रोश मोर्चात शेतकरी मुद्द्यांचा जागर; बडे नेते सहभागी
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
आज शेतकरी अस्वस्थ आहे. महाराष्ट्राच्या जवळपास सगळ्या जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. याचा विपरीत परिणाम शेतीवर झाला. संकटातून मार्ग काढायचा असतो तो मार्ग काढण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारांची असते. शेतकरी आक्रोश करतो आहे, मात्र आजचे राज्यकर्ते त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा हल्लाबोल शरद पवार यांनी आक्रोश मोर्चाच्या समारोपप्रसंगी केला. मुख्यमंत्र्यांना ‘देवाभाऊ’ म्हणत, नुकत्याच प्रसिध्द झालेल्या निनावी जाहिरातींचा उल्लेख करत पवारांनी त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. पवार यांनी कृषी धोरणांवरून राज्यासह केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. चुकीच्या धोरणांनी आत्महत्या होत असल्याचे ते म्हणाले. आपल्याला बघ्याची भूमिका घेता येणार नाही. आगामी ठराविक दिवसांत तुम्ही मदत केली नाही तर नाशिकचा हा मोर्चास भविष्यात आणखी उग्र रूप घेईल, असा इशारा त्यांनी शेवटी दिला.
शेतीमालाला हमी भाव द्या, कर्जमाफी जाहीर करा, कांद्याची मुक्त निर्यात सुरु करा, कापूस आयात बंद करा आदी मागण्यांचा पुकारा करीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सोमवारी दुपारी शहरातून आक्रोश मोर्चा काढण्यात आला. इदगाह मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावरून काढलेल्या या मोर्चात पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह खा. सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आ. रोहित पवार, रोहिणी खडसे यांसह स्थानिक नेते आणि पदाधिकारी तसेच नाशिक, जळगाव जिल्ह्यांतील शेतकरी सहभागी झाले.
पक्षाच्या एक दिवसीय शिबिरानंतर सोमवारी हा मोर्चा काढण्यात आला. गेल्या अनेक दिवसांपासून मोर्चा यशस्वी होण्यासाठी नियोजन करण्यात आल्याने मोर्चाला मोठी गर्दी झाली होती. मोर्चाच्या अग्रभागी शरद पवार हे उघड्या जीपमध्ये उभे राहून जनतेला अभिवादन करत होते. या जीपच्या पुढील भागावर कांद्याची रास ठेवण्यात येऊन आमच्या पक्षाची शेतकरी वर्गासोबत कशी बांधिलकी आहे, हे दर्शविण्याचा प्रयत्न केला गेला. मोर्चामध्ये महायुती सरकारच्या शेतकरी धोरणाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चाच्या अखेरीस पक्षाच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. निवेदनात शेतकरी कर्जमाफी आणि वाढत्या आत्महत्या, पीक विमा, कांदा निर्यातबंदी, अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान, युवांना रोजगार या मुद्द्यांचा उहापोह करण्यात आला. मोर्चामध्ये माजी मंत्री अनिल देशमुख, हर्षवर्धन पाटील, आ. सुनील भुसारा, गोकुळ पिंगळे, गजानन शेलार आदी सहभागी झाले.
मोर्चाद्वारे राजकीय बीजारोपण..
लोकसभा निवडणुकीत दिंडोरीची जागा राखण्यात यशस्वी झालेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या हाती विधानसभा निवडणुकीत मात्र भोपळा लागला. पक्षाचे अनेत नेते इतर पक्षांत दाखल झाल्याने संघटन खिळखिळे झाले आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पाया मजबूत करण्याच्या दृष्टीने शरद पवार यांच्यासह बिनीच्या सर्व नेत्यांनी नाशिकमध्ये उपस्थिती दर्शवली. कार्यकर्ता शिबिर आणि मोर्चाच्या माध्यमातून वातावरणनिर्मिती करण्यात पक्षाला यश मिळाल्याचे म्हणता येईल.
Comments are closed.