NGN News
Latest Marathi News

शरद पवार म्हणाले, जरांगे यांच्या आंदोलनाशी कवडीचाही संबंध नाही !

सामाजिक ऐक्याला तडा बसत असल्याची खंत व्यक्त

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाशी आमचा कवडीचाही संबंध नसल्याची स्पष्टोक्ती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे दिली. सामाजिक ऐक्य हे महाराष्ट्राचे स्थापनेपासून वैशिष्ट्य राहिले आहे. मात्र या ऐक्याला तडा बसत असल्याची टिपण्णीही त्यांनी केली.

पक्षाच्या शिबिराला शहरात आलेल्या पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. पवार म्हणाले, विविध समाजांत कटुता यावयास नको ही काळजी सर्वांनी घेणे गरजेचे आहे. सर्व घटकांनी एकत्रित चर्चा करून मार्ग काढला पाहिजे. हे अमुक एकासाठी, ते तमुक त्याच्यासाठी असे करणे सरकार म्हणून योग्य ठरणार नाही. वेगवेगळ्या समाजाच्या समित्या बनवल्या जात आहेत. कोणतेही सरकार एका जातीचे, एका समाजाचे नाही तर सर्वांचे असते. समित्यांच्या नियुक्त्या करताना व्यापक दृष्टिकोन ठेवायला हवा. एकच समिती असावी हे माझे म्हणणे नाही. परंतु ती एका जातीची नको, याबाबत मात्र मी ठाम आहे.

भुजबळांना सल्ला.. असे भाष्य अयोग्य

दरम्यान, ओबीसी आरक्षणाबाबत आक्रमक भूमिका घेतलेल्या मंत्री छगन भुजबळ यांना पवार यांनी सल्ला दिला. आम्हाला सामाजिक ऐक्य हवे आहे. त्यासाठी काही व्यापक कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू. एका विशिष्ट जातीचे राजकरण जमत नाही. समाजा-समाजात अंतर वाढेल असे भाष्य करणे योग्य नाही, असे पवार भुजबळ यांना उद्देशून म्हणाले. मराठा समाजाची कुणबी दाखल्यांच्या माध्यमातून ओबीसी प्रवर्गात घुसखोरी होत असल्याबद्दल भुजबळ यांनी कमालीची आक्रमक भूमिका घेतली आहे.

बड्या नेत्यांची उपस्थिती ..

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे एकदिवसीय शिबिराचे येथील स्वामी नारायण बँक्वेट हॉलमध्ये आयोजन करण्यात आले. या शिबिरात पक्षाचे प्रमुख शरद पवार, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, रोहित पवार यांच्यासह राज्यभरातील अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. तथापि, खासदार अमोल कोल्हे आणि सुरेश म्हात्रे यांच्यासह पाच आमदार विविध कारणाने अनुपस्थितीत आहेत.

Comments are closed.