लासलगाव : राकेश बोरा
निफाड तालुक्यातील मरळगोई खुर्द येथील शेतकऱ्यांना तीन ते चार दिवसांपासून हैराण करणारा बिबट्या अखेर वनविभागाच्या ताब्यात आला आहे. शंकर दरेकर यांच्या द्राक्षबागेत व मक्याच्या शेतात वास्तव्य करून दशहत माजवणाऱ्या या बिबट्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मागील काही दिवसांपासून गावातील शेतकऱ्यांना रात्री शेतावर जाणे कठीण झाले होते. गुरेढोरे व पाळीव प्राण्यांवर हल्ला होईल या भीतीने शेतकरीही सावध झाले होते. ग्रामस्थांनी याबाबत निफाड वनविभागाकडे तक्रार केली. त्यानंतर वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याला पकडण्यासाठी मोहीम सुरू केली. शुक्रवारी मध्यरात्री बिबट्या शिकार करण्यासाठी बाहेर पडला असता तो थेट पिंजऱ्यात शिरला आणि जेरबंद झाला. शनिवारी ( दि. १३ ) सकाळी ही बाब समोर आल्यानंतर गावात सुटकेचा निःश्वास सोडला.
ग्रामस्थांचा सुटकेचा नि:श्वास
वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून बिबट्याला सुरक्षितरीत्या हलविण्यात आले असून, त्याला जंगल परिसरात सोडण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे गेल्या काही दिवसांपासून भीतीच्या छायेत जगणाऱ्या मरळगोई व परिसरातील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Comments are closed.