संतप्त नातेवाईक, गावकरी पोलीस ठाण्यात ; संशयिताला बेड्या
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
मालेगावच्या पाडळदे गावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील आठवी इयत्तेत शिकणाऱ्या एका चौदा वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याची विहिरीत फेकून हत्या करण्यात आली आहे. शनिवारी ( दि. १३ ) उघड झालेल्या या घटनेनंतर गावात संतापाची लाट उसळली आहे. समाधान बळीराम माळी असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात संशयित सोमनाथ झिंजर ( वय ३५ ) यास ताब्यात घेवून त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारी ( दि. १२ ) सायंकाळी सोमनाथ याने समाधान यास आपल्या मोटारसायकलवर बसवून शेतात नेल्याचे काहींनी पाहिले होते. तथापि, मध्यरात्र उलटूनदेखील समाधान घरी न आल्याने त्याच्या कुटुंबीयांनी शोधाशोध सुरु केली. यासंदर्भात, समाधान ज्याच्यासोबत शेतात गेला होता, त्या सोमनाथ याच्याकडेही मोबाईलवर चौकशी करण्यात आली. त्यानंतर तोदेखील शोधकार्यात सहभागी झाला. शनिवारी सकाळी सोमनाथ याच्या विहिरीत समाधानची चप्पल तरंगताना आढळली. काही तरुणांनी विहिरीत उद्या मारून शोध घेतला असता समाधान याचा मृतदेह मिळाला. मृतदेह बाहेर काढून त्याची सामान्य रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली.
मारहाण करून हत्या ?
दरम्यान, सोमनाथ याने गोड बोलून समाधानला शेतात नेले आणि मारहाण करून त्याची हत्या केली, असा आरोप समाधानच्या कुटुंबीयांनी केला आहे. या धक्कादायक हत्येनंतर समाधानचे नातेवाईक आणि गावकरी संतप्त झाले. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांस घेराव घालत आरोपीला अटक करण्याची मागणी केली. यासंदर्भात मालेगाव तालुका पोलिसांत गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी संशयित सोमनाथ यास ताब्यात घेतले. सोमनाथ याने समाधानची हत्या का केली, हे मात्र समजू शकले नाही.
Comments are closed.