- मनसे-ठाकरे गटाच्या जनआक्रोश मोर्चाला मोठा प्रतिसाद
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
शहराच्या पंचवटीतील राहुल धोत्रे नामक तरुणाची हत्या भाजप कार्यकर्त्याकडून करण्यात आली. माजी नगरसेवक असलेले उद्धव निमसे हे कुठे गेले आणि ते का सापडत नाहीत, असा संतप्त सवाल शिवसेना उबाठा गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी आज येथे केला. तुमचा एक माजी नगरसेवक खून करून फरार असताना भाजपच्या एका मंत्र्याला जाऊन भेटतो. त्याला कोण वाचवतंय, हे जर राज्याच्या गृहमंत्र्यांना माहीत नसेल तर तुम्ही राज्य करायला नालायक आहात, असा घणाघातही त्यांनी केला.
नाशिकमध्ये शुक्रवारी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या वतीने जनआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी सांगता सभेत खा. संजय राऊत बोलत होते. मनसे नेते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, अविनाश अभ्यंकर, शिवसेना उबाठाचे सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गीते, जिल्हाप्रमुख दत्तात्रय सूर्यवंशी, मनसे सरचिटणीस दिनकर पाटील, जिल्हाप्रमुख अंकुश पवार, सुदाम कोंबडे, संदेश जगताप, प्रफुल्ल बनभिरू, धीरज भोसले, भाऊसाहेब निमसे आदी यावेळी उपस्थित होते. मोर्चाला मोठा प्रतिसाद लाभला.
खा. राऊत म्हणाले , हा जनआक्रोश मोर्चा आहे. जनतेचा आक्रोश रस्त्यावर उतरतो तेव्हा नेपाळ होते, बांगलादेश होतो, हा इशारा देण्यासाठीच हा मोर्चा आहे. नेपाळमध्ये लोक रस्त्यावर का उतरले याचे उत्तर नाशिकमध्ये आहे. प्रचंड भ्रष्टाचार, सरकारी पैशाची लूट, अमली पदार्थाचा प्रचंड व्यापार, तरुण मुले नशेच्या आहारी गेलेले आहेत. म्हणून लोक रस्त्यावर आले आहेत, असा हल्लाबोल त्यांनी केला.
हा तर केवळ प्रारंभ : नांदगावकर
याप्रसंगी बाळा नांदगावकर म्हणाले, प्रारंभी आता फक्त नेतेमंडळी आणि कार्यकर्ते एकत्र आले आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र उतरले तर तुमचे काय होईल याचा विचार तुम्हीच करा. इकडून तिकडून माणसे जमवत आहात. सगळ्याच जातींचे लोक आमचे मराठी आहेत. आपण मराठी म्हणून एकत्र येऊ. आपण मराठी म्हणून या ताकदीचा सर्वनाश करायला पाहिजे. ज्या नाशिकला दत्तक घेतले होते त्या नाशिकला काय मिळाले? इथले अनेक प्रकल्प बंद केले आणि लोकांच्या तोंडाला पाने पुसायचं काम तुम्ही केलेलं आहे. खोटारडेपणाचा आता कळस झालेला आहे, असा हल्लाबोल त्यांनी भाजप सरकारवर केला. यावेळी संदीप देशपांडे, अविनाश अभ्यंकर, दिनकर पाटील यांचीही भाषणे झाली. मोर्चामध्ये दोन्ही पक्षाचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments are closed.