NGN News
Latest Marathi News

‘सीपीआरआय लॅब’ नाशिक इलेक्ट्रिक हब होण्यासाठी पूरक : मनोहरलाल खट्टर

‘निमा इंडस्ट्रियल मीट’ मध्ये प्रतिपादन; मान्यवरांची उपस्थिती

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिककरांना बहुप्रतिक्षित सीपीआरआय लॅबचे गिफ्ट मिळाल्याने आता 10 एमव्हीएमपर्यंतचे परीक्षण करता येणार आहे. या लॅबमुळे नाशिक इलेक्ट्रिक हब होण्यास पूरक वातावरण निर्माण होईल, असा विश्वास केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी येथे व्यक्त केला.

सीपीआरआय लॅबच्या उद्घाटनिमित्त नाशिकमध्ये आलेल्या खट्टर यांच्यासोबत निमा,आयमा पदाधिकारी व उद्योजकांसोंबत ‘निमा इंडस्ट्रियल मीट’चे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार राहुल ढिकले, निमा अध्यक्ष आशिष नहार, आयमा अध्यक्ष ललित बूब, सीपीआरआय मुख्य असित सिंग, निवृत्त संचालक बी. ए. सावळे, सह संचालक युगल अग्रवाल उपस्थित होते.

निमा अध्यक्ष आशिष नहार यांनी प्रास्ताविकात नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राची सविस्तर माहिती देत येथील जवळपास साठ दशकांपासून देश-विदेशातील विस्तार करीत असलेल्या मोठ्या लहान उद्योगांची माहिती देत नाशिकला इलेक्ट्रिकल हब चा दर्जा मिळून विशेष सवलती मिळण्याची मागणी केली. आयमा अध्यक्ष ललित बूब यांनी उपकरणे तपासणी दर लघु उद्योगांसाठी सवलतीत आकारण्याची विनंती केली. एबीबी कंपनीचे मुख्य गणेश कोठावदे यांनी टेस्टिंग सुविधेची प्रशंसा करत ठराविक कालावधीची तपासणी सक्तीची करू नये अशी विनंती केली.

सीजीपॉवर चे युनिट हेड अजय कहाणे यांनी जागतिक दर्जाच्या काही तपासणी सुविधा सुरू करण्याविषयी आपले मत मांडले. ऋषभ लिमिटेड मुख्य कार्यकारी अधिकारी नरेंद्र गोलिया यांनी पॉवर क्वालिटीच्या देशभरात वाढत चाललेल्या समस्या मांडल्या.
निमा पॉवर अध्यक्ष मिलिंद राजपूत यांनी विद्युत क्षेत्रातील देशात येणाऱ्या नवीन गुंतवणुकीसाठी नाशिकला प्राधान्य देण्याची विनंती केली. ऊर्जा मंत्री ना.मनोहरलाल खट्टर यांनी त्वरीत उपस्थित सीपीआरआय वरिष्ठ अधिकारी यांना तपासणी दर कमी करण्यासाठी व सुविधा वाढवण्यासाठीचा अहवाल आपल्या कार्यालयात सादर करण्याची सूचना दिली. देशभरात अश्या प्रकारच्या लॅब ची निर्मिती करून राष्ट्रीय हित साधण्याची संकल्पना मांडली. पुढील टप्प्यातील ह्या लॅबचा विस्तार करण्याचे आश्वासन त्यांनी बैठकीत दिले. निमा उपाध्यक्ष मनीष रावल यांनी आभार मानले.

सदर बैठकीला निमा सचिव राजेंद्र अहिरे, महाराष्ट्र चेंबरचे माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा, राजेंद्र पानसरे, सीपीआरआय कमिटी अध्यक्ष कैलास आहेर, गणेश कोठावदे, अजय कहाणे, नरेंद्र गोलिया , योगिता आहेर, हर्षद ब्राह्मणकर, कैलास पाटील, मंगेश काठे, शैलेश नारखेडे, मिलिंद चिंचोलीकर, प्रकाश गुंजाळ , विरल ठक्कर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Comments are closed.