एन्व्हॉरॉन्मेंटल सायन्स आणि मॅथेमॅटिक्स विथ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्सला प्रवेश सुरु
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विज्ञान विद्याशाखेने राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार नवीन पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केले आहेत. यामध्ये बी.एस्सी (ऑनर्स) – पर्यावरण विज्ञान (एन्व्हॉरॉन्मेंटल सायन्स) आणि एम.एस्सी. मॅथेमॅटिक्स विथ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स (गणित-संगणक उपयोजन) या दोन शिक्षणक्रमांचा समावेश आहे.
हे शिक्षणक्रम यूजीसी-डीईबी मान्यताप्राप्त आहेत. ते केवळ सैद्धांतिक ज्ञानावरच नाही तर राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या तरतुदींवर आधारित आहे. बी.एस्सी. (ऑनर्स) (पर्यावरण विज्ञान) हा शिक्षणक्रम विद्यार्थ्याला हवामान विज्ञान, रिमोट सेन्सिंग आणि ईआयए (EIA) यांसारख्या विषयांचे सखोल ज्ञान देईल. तसेच मायनर, ओपन इलेक्टिव्ह, कम्युनिटी एंगेजमेंट, को-करिक्युलर आणि कौशल्य वाढवणाऱ्या विषयांची निवड करण्याची संधीही देईल.
पदवी मिळवल्यानंतर विद्यार्थी ईआयए विशेषज्ञ, संशोधक, सस्टेनेबिलिटी कन्सल्टंट, पर्यावरणशास्त्रज्ञ म्हणून काम करू शकतात. पर्यावरण संवर्धन करणाऱ्या सामाजिक संस्था (एनजीओ), शैक्षणिक संस्था, सीपीटीबी/एसपीबी यांसारख्या विविध सरकारी आणि खाजगी संस्थांमध्येही रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. एम.एस्सी. (गणित-संगणक उपयोजन) या शिक्षणक्रमात क्रिप्टोग्राफी, एआय (AI), एमएल, डेटा सायन्स, प्रोग्रामिंग यांसारख्या विषयांचा समावेश आहे. त्यातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक, संशोधन, डेटा अॅनालिसिस, कन्सल्टन्सी, फायनान्स यासारख्या विविध क्षेत्रात सरकारी तसेच खासगी संस्थांमध्ये करिअरच्या उत्तम संधी उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या हेल्पलाइन क्रमांक ०२५३ – २२३०५८० / २२३१७१५ वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Comments are closed.