इलेक्ट्रिकल हबसाठी आवश्यक बाबीची स्वप्नपूर्ती झाल्याची प्रतिक्रिया
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक हे इलेक्ट्रिकल हब असल्याने येथे सीपीआरआय लॅब सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी ‘निमा’ने सातत्याने लावून धरली होती. तिला मूर्त स्वरूप लाभत असल्याने या औद्योगिक नगरीसाठी आज सोनियाचा दिवस असल्याची प्रतिक्रिया ‘निमा’चे अध्यक्ष आशिष नहार यांनी व्यक्त केली.
नाशिकसह पश्चिम भारतातील इलेक्ट्रिक हबला वरदान ठरणाऱ्या 216 कोटी रुपये खर्चून शिलापूर, ( ता. नाशिक ) येथे साकारलेल्या बहुप्रतिक्षित सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूट (सीपीआरआय) लॅबचे उद्घाटन बुधवारी केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या हस्ते संपन्न होत आहे. या पार्श्वभूमीवर आशिष नहार बोलत होते.
ते म्हणाले, सीपीआरआय लॅबमुळे 10 एमव्हीएमपर्यंतचे परीक्षण आता येथे होणार असल्याने नाशिककरांना इतरत्र जाण्याची त्यामुळे गरज भासणार नाही. स्मार्ट ऊर्जा मीटर परीक्षणही आता येथे शक्य होणार आहे. 800 केव्ही उच्च व्होल्टेज परीक्षण सुविधा या लॅबमध्ये उपलब्ध असेल. नाशिक हे इलेक्ट्रिकल हब असल्याने येथे सीपीआरआय लॅब ची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी ‘निमा’ने सातत्याने लावून धरली होती. तत्कालीन केंद्रीय मंत्री दिवंगत विलासराव देशमुख आणि तत्कालीन खासदार समीर भुजबळ यांच्या प्रयत्नांमुळे निमाच्या पुढाकाराने २०१२ मध्ये या लॅबसाठी शिलापूर येथे जागा उपलब्ध करून देण्यात आली. तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ, गिरीश महाजन व खासदार हेमंत गोडसे यांचे सुद्धा या प्रकल्पासाठी मोलाचे योगदान लाभले. या लॅबच्या रोडसाठी ‘निमा’ ने पाठपुरावा केला आणि जिल्हाधिकारी जलज शर्मा, तत्कालीन जिल्ला परिषदेच्या सीईओ सौ.आशिमा मित्तल यांनी ते पूर्णत्वास नेण्यास सहकार्य केले.
जानेवारी 2019 ला तत्कालीन केंद्रीय ऊर्जामंत्री आर.के.सिंग यांच्या हस्ते या लॅबची कोनशीला बसविण्यात आली आणि आज ह्या लॅब चे उद्घाटन होत आहे ही नाशिकसाठी अभिमानाची बाब असल्याचेही नहार यांनी स्पष्ट केले.
Comments are closed.