- विशाल पवार, प्रथमेश गीते, राजेश गांगुर्डे या इच्छुकांच्या वतीने आक्षेप
नाशिक : आगामी महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रारूप प्रभागरचना जाहीर केली असून शहरातील दोन प्रभाग चार ऐवजी तीन सदस्यीय निश्चित करण्यात आले आहेत. त्यामध्ये शहराचा मध्यवर्ती भाग समजल्या जाणाऱ्या भाभानगर-काठेगल्ली परिसर समाविष्ट असलेल्या प्रभाग क्रमांक १५ चा समावेश करण्यात आला आहे. आयोगाच्या या निर्णयावर शिवसेना उबाठा गटाने हरकत नोंदवली आहे. प्रभागातील विशाल पवार, प्रथमेश गीते आणि राजेश गांगुर्डे या इच्छुकांच्या वतीने महापालिका प्रशासनाकडे हरकत नोंदवण्यात आली आहे.
महापालिका निवडणुकीसाठी २०१७ च्या रचनेनुसार अलीकडे नाशिकची प्रारूप प्रभागरचना जाहीर झाली. त्यानुसार एकूण ३१ प्रभागांतून १२२ सदस्य निवडून द्यावयाचे आहेत. तथापि, २९ प्रभाग प्रत्येकी चार सदस्यीय असताना प्रभाग ७ आणि १५ हे तीन सदस्यीय करण्यात आले. पैकी प्रभाग क्रमांक १५ संदर्भात पवार, गीते आणि गांगुर्डे यांनी हरकत नोंदवली आहे. यासंदर्भात, योग्य अभयस करून निर्णय घेण्याचे आश्वासन आयुक्त मनिषा खत्री दिल्याची माहिती तिघांनी दिली.
काय आहेत हरकतीचे मुद्दे ?
शिवसेना उबाठा गटाच्या या इच्छुक नेत्यांच्या मते २०१७ मध्ये प्रभागाची मतदारसंख्या ३१ हजार इतकी होती. गेल्या आठ वर्षांत ती जवळपास अकरा हजारांनी वाढली आहे. म्हणजेच या प्रभागात ४२ हजार मतदार असताना तीन सदस्यीय रचना करणे अव्यवहार्य आहे. शहराच्या मध्यवर्ती क्षेत्रात येणाऱ्या या प्रभागाची जाणीवपूर्वक मोडतोड करण्यात आल्याची शंका नागरिकांसह आम्हाला असल्याचे मत विशाल पवार, प्रथमेश गीते आणि राजेश गांगुर्डे या इच्छुकांच्या वतीने महापालिका आयुक्त मनीषा खत्री आणि वरिष्ठ अधिकारी संजय खंदारे यांच्यासमक्ष व्यक्त करण्यात आले. हा अट्टाहास राजकीय दबावातून झाला तर नाही ना, अशी शंकाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
१२ सप्टेंबर रोजी सुनावणी..
दरम्यान, आतापर्यंत एकूण ३१ प्रभाग मिळून ९१ हरकती प्राप्त झाल्या असून त्यावर अंतिम सुनावणी येत्या १२ सप्टेंबर रोजी होणार आहे. या सुनावणीकडे नाशिककरांचे लक्ष लागून राहणार आहे.
—————–
@ राज्य निवडणूक आयोगाने नाशिक महापालिकेसाठी जाहीर केलेली प्रारूप प्रभागरचना अचंबित करणारी आहे. प्रभाग क्रमांक १५ मध्ये गेल्या आठ वर्षांत झालेली अकरा हजार मतदारांची वाढ दुर्लक्षित करून आमचा प्रभाग तीन सदस्यीय करण्यात आला, हे धक्कादायक आहे. शहराचा मध्यवर्ती भाग असताना त्याबाबत असा निर्णय घेण्यामागे राजकीय दबावाचा संशय घेण्यास पुरेसा वाव आहे. आता सुनावणीत नेमका काय निर्णय येतो, ते बघुयात.
- विशाल पवार, इच्छुक, उबाठा शिवसेना, नाशिक
Comments are closed.