- गणेशभक्तीला उधाण; २५ सार्वजनिक मंडळांचा सहभाग ; शेवटच्या गणेशाचे पहाटे तीन वाजता विसर्जन
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
पारंपारिक क्रीडाप्रकार.. देव-देवतांच्या वेशभूषा.. लेझीम पथकांचे पदलालित्य.. सार्वजनिक मंडळांतील कार्यकर्त्यांचा ओसंडून वाहणारा उत्साह.. वरुणराजाची संततधार आणि ढोल-डीजेचा दणदणाट अशा जल्लोषपूर्ण वातावरणात नाशिकमधील श्री गणेशाची विसर्जन मिरवणूक पार पडली. अनेक मंडळांनी मिरवणुकीत सदर केलेले जिवंत देखावे गणेशभक्तांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला. यंदाच्या मिरवणुकीत एकूण २५ सार्वजनिक मंडळानी सहभाग नोंदवला. सकाळी ११ च्या सुमारास सुरु झालेली मिरवणूक पहाटे तीन वाजेपर्यंत सुरु होती. मिरवणुकीदरम्यान पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.
गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने विघ्नहर्त्याला निरोप देण्याच्या दिवशीही शहरात जोरदार हजेरी लावली. तथापि, गणेशभक्तांनी आपला उत्साह कायम ठेवत परीम्पारिक मिरवणुकीत मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. पारंपारिक वाकडी बारव येथून राज्याचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, माजी आमदार वसंत गीते, माजी महापौर विनायक पांडे, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, सार्वजनिक गणेश समिती अध्यक्ष समीर शेटे आदींच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवण्यात आल्यानंतर मिरवणुकीचा श्रीगणेशा झाला. नाशिक महापालिकेच्या गणपतीला मानाचे स्थान मिळाल्यानंतर त्यापाठोपाठ प्रशासनाने ठरवून दिलेल्या क्रमांकाने पुढील गणेश मंडळे रवाना झाली.
मिरवणुकीत रविवार कारंजा मित्र मंडळाचा रथामध्ये आरूढ झालेला चांदीचा श्रीगणेश नाशिककरांचे लक्ष वेधून घेत होता. पाठोपाठ मेनरोडवरील शिवसेवा मित्र मंडळाचा देव-देवतांच्या वेशभूषेतील देखावा भक्तांची दाद मिळवून गेला. अनेक मंडळानी मिरवणुकीत विद्युत रोषणाई असलेले देखावे सदर केले होते. विशेष म्हणजे पावसाची संततधार असूनही नाशिककर गणेशभक्तांनी मिरवणुकीतील देखावे पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. सकाळी लवकर मिरवणूक प्रारंभ करून रात्री बारा वाजेच्या आत संपवायची, या ठरलेल्या निर्धाराचे मात्र पालन झाले नाही. निर्धारित वेळेच्या बराच काळ नंतर मिरवणूक सुरु होती.
गिरीश महाजन ठेका धरतात तेव्हा..
मिरवणुकीस प्रारंभ झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले. यावेळी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनीही उत्स्फुर्तपणे ठेका धरला. आ. देवयानी फरांदे आणि इतर भाजप पदाधिकारी देखील नृत्यामाग्न झालेले दिसले. यानंतर महाजन यांनी ढोलवादन केले तर आ. फरांदे यांनी झांज वाजवली. हा सर्व उत्साही सोहळा मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
८० सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोनची नजर..
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठीकठिकाणी पोलीस पथक कार्यरत होते. शिवाय मिरवणूक मार्गावर ८० सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोन यांच्या सहाय्याने गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात आले. मंडळानी एका ठिकाणी ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ थांबू नये, यासाठी पोलिसांनी विशेष काळजी घेतल्याचे दिसून आले.
मूर्ती, निर्माल्य संकलनासाठी संस्थांचा पुढाकार..
दरम्यान, शहरातील प्रमुख ठिकाणे तसेच विविध ठिकाणी होणाऱ्या विसर्जनस्थळी अनेक सामाजिक आणि स्वयंसेवी संस्था यांच्यावतीने सकाळपासूनच गणेशमूर्ती तसेच निर्माल्य संकलनाचे कार्य सुरु होते. पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही काळाची गरज असल्याचे फलक लावून हे संकलन करण्यासाठी अनेक संस्था-संघटनांचा हिरीरीने सहभाग दिसून आला. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गणेशभक्त तसेच लहान मंडळांनी मूर्ती दान केल्या.
महापालिकेकडून नैसर्गिक, तर कृत्रिम तलाव नियोजन
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी महापालिका प्रशासनाकडून श्रीगणेश विसर्जनासाठी २८ नैसर्गिक, तर जलप्रदूषण टाळण्यासाठी ४९ कृत्रिम तलावांचे नियोजन करण्यात आले होते. विसर्जन करताना पीओपी मूर्ती नदीपात्रात विसर्जित न करता दान करण्याचे आवाहन करण्यात आले. पी.ओ.पी.च्या मूर्ती विसर्जनासाठी महापालिकेने विनामूल्य अमोनियम बायकार्बोनेट पावडरची व्यवस्था केली होती. या पावडरमुळे पीओपीच्या मूर्ती सहजपणे विरघळतात आणि प्रदूषण टाळले जाते. ही पावडर महापालिकेच्या विविध विभागीय कार्यालयांतून पुरवण्यात आली.
Comments are closed.