NGN News
Latest Marathi News

उद्यापासून कडक उपोषण; उद्यापासून पाणीही घेणार नाही.. जरांगेंची भूमिका !

मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृ्त्वाखाली आझाद मैदानात मराठ्यांचे आंदोलन सुरु आहे. राज्यभरातून मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणावर आझाद मैदानात उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहे. आज या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी उद्यापासून कडक उपोषण करणार असल्याचे स्पष्ट करून त्यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे.

 ते म्हणाले, दोन दिवस मी पाणी प्यायलो. उद्यापासून मी पाणी घेणार नाही. पाणी बंद करणार आहे. सरकार ऐकत नाही. उपोषण कडक करणार. मराठा तरुणांनी मान खाली घालावी लागेल असं पाऊल उचलायचं नाही. सर्वांनी शांत राहायचं. यांनी कितीही अन्याय अत्याचार करू द्या. मी आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही. हा माझा शब्द आहे.’

पुढे ते म्हणाले, शनिवारी जर मुख्यमंत्र्यांच्या घरी बैठक झाली. तातडीने मार्ग काढा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत असे मी ऐकलेय. मग ज्यांना आदेश दिले तर ते मार्ग का काढत नाही. उपसमितीला आदेश दिला. मग मार्ग का काढत नाही?  

माझ्या नावावर ते कमावताहेत

‘कुणी रेनकोट, छत्र्या वाटत असतील तर एक रुपया देऊ नका. त्यांच्या छत्र्या, रेनकोट घेऊ नका. काही लोकांनी धंदा सुरू केला आहे. समाजाच्या नावाने कमवत आहेत. माझ्या नावावर कमावत आहेत. रेनकोट वाटपाच्या नावाखाली पैसे गोळे करू नका. शेवटचं सांगतो. महाराष्ट्रातील मराठ्यांनी कुणालाही पैसे द्यायचे नाही. गरीबाची सेवा करा. लोकं ट्रक भरून घेऊन येत आहेत. कुणी नाव सांगत नाही. समाजाला मदत करायची सोडून पैसे छापायला बघत आहे’ असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Comments are closed.