NGN News
Latest Marathi News

गीता ज्ञान विज्ञान केंद्रासाठी मंत्री भुजबळ यांचा ५० लाखांचा निधी

साध्वी रखुमाई यांच्या “गीता जयंती” उत्सवाचे यंदा अमृत महोत्सवी वर्ष

येवला : एनजीएन न्यूज नेटवर्क

तालुक्यातील सोमठाण जोश येथे साध्वी रखुमाई यांनी सुरु केलेल्या गीता जयंती उत्सवाला यंदा ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्ताने राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आमदार विकास निधीतून गीता ज्ञान विज्ञान केंद्रासाठी ₹५० लाखांचा निधी जाहीर केला आहे.

जलहक्क संघर्ष समितीचे भागवतराव सोनवणे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या कडे मागणी केली होती. एप्रिल 2025 मध्ये या कामासाठी 20 लाख मंजुरी देण्यात आली होती, परंतु कामाचे स्वरूप आणि व्याप्ती लक्षात घेऊन वाढीव 30 लाख रुपये निधीला मान्यता देण्यात आली आहे.


” ज्ञान विज्ञान केंद्रासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, बहुउद्देशीय सभागृह, तंत्रज्ञानाधारित अध्यापन यंत्रणा, दृकश्राव्य यंत्रणा,उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना गीता तत्त्वज्ञान आणि आधुनिक विज्ञानाचा संगम अनुभवता येणार आहे. “

  • भागवतराव सोनवणे
    प्रसिद्धी प्रमुख – गीता ज्ञान विज्ञान केंद्र, येवला

गीता जयंतीच्या ७५ व्या वर्षानिमित्ताने २५ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२५ या कालावधीत गीता ज्ञान विज्ञान महोत्सव होणार असून यात राज्यभरातील नामवंत अध्यात्मिक वक्ते सहभागी होऊन गीतेवरील विचार मांडणार आहेत.


भुजबळ यांच्या उपस्थितीत सांगता सोहळा


१ डिसेंबर रोजी गीता जयंतीचा सांगता सोहळा सोमठाण जोश (ता. येवला) येथे भव्य दिमाखात पार पडणार असून, यात राज्यातील विविध संप्रदायांचे संत, महंत कीर्तनकार, वारकरी व भाविकांची मोठी गर्दी जमणार आहे.
मंत्री भुजबळ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

संपूर्ण येवला तालुक्यात भक्तिरस, शांती, ज्ञान व अध्यात्मिक ऊर्जा अनुभवता येणार आहे. गीता तत्त्वज्ञानाचे प्रबोधन तसेच सामाजिक एकात्मतेचा संदेश दूरदूरपर्यंत पोहोचवण्याची संधी गीता ज्ञान विज्ञान केंद्रा मार्फत उपलब्ध करुन दिली जाणार आहे
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी हभप आनंदा महाराज सोमठाणकर यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापक नियोजन करण्यात आले असून, स्थानिक नागरिक, सेवाभावी संस्था आणि अध्यात्मप्रेमी यांचे सक्रिय सहकार्य लाभत आहे.

Comments are closed.