NGN News
Latest Marathi News

‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये योगदान; नांदूरवैद्यच्या विकास मेदडे यांना ‘सेना मेडल’

  • केंद्रीय संरक्षण मंत्रालयाची घोषणा; जानेवारीत होणार गौरव

इगतपुरी : वाल्मिक गवांदे

२६ भारतीय पर्यटकांना हौतात्म्य देणाऱ्या पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्याच्या दृष्टीकोनातून राबवण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या इगतपुरीच्या नांदूरवैद्य गावचे भूमिपुत्र विकास रामदास मेदडे यांना केंद्रीय संरक्षण विभागाने ‘सेना मेडल’ जाहीर केले आहे. विकास मेदडे हे १८ मराठा लाईट इन्फ्रन्ट्रीमध्ये हवालदार पदावर कार्यरत आहेत.

पाकिस्तानविरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरु असताना जम्मू काश्मीर भागात कर्तव्यावर असलेल्या मेदडे यांनी दिलेल्या योगदानाची भारतीय सैन्य दलाकडून दखल घेत हा सन्मान करण्यात आला आहे. या घोषणेनंतर नांदूरवैद्य गावात आनंद व्यक्त करण्यात आला. पुढील वर्षी ( २०२६ ) १५ जानेवारी रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या सोहळ्यात विकास मेदडे यांना पुरस्काराने गौरवण्यात येईल.

जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब..

इगतपुरीच्या नांदूरवैद्य गावचे भूमिपुत्र असलेल्या विकास मेदडे यांचा जन्म एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला आहे. भारतीय लष्करात जाण्याचे त्यांचे बालपणापासून स्वप्न होते. ते ध्येय समोर ठेवून ते वास्तवात सैनिक बनले. त्यांचे थोरले बंधू योगेश यांनी त्यांना त्यासाठी प्रोत्साहन दिले. देवळाली कॅम्प येथील १८ मराठा बटालियनमध्ये ते भरती झाले. त्यांचा सन्मान होणे , संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याची प्रतिक्रिया बंधू योगेश मेदडे यांनी व्यक्त केली.

Comments are closed.