NGN News
Latest Marathi News

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सोलापूर जिल्हा पर्यटन महोत्सव लोगोचे अनावरण

  • ‘5-पी ब्रँडिंग’द्वारे होणार सोलापूर पर्यटनाचा जागतिक प्रवास आणि सर्वांगीण-सर्वसमावेशक विकास,
  • माजी मंत्री श्री सुभाष देशमुख यांच्या नेतृत्त्वात आणि ‘सोलापूर सोशल फाउंडेशन’तर्फे २७ सप्टेंबर हा जागतिक पर्यटन दिन  ते २ ऑक्टोबर या महात्मा गांधी जयंतीदरम्यान ‘सोलापूर जिल्हा पर्यटन महोत्सव २०२५’ चे आयोजन

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

‘सोलापूर सोशल फाउंडेशन’तर्फे २७ सप्टेंबर हा जागतिक पर्यटन दिन  ते २ ऑक्टोबर या महात्मा गांधी जयंतीदरम्यान ‘सोलापूर जिल्हा पर्यटन महोत्सव २०२५’ चे आयोजन करण्यात आले असून या महत्वाकांक्षी महोत्सवाच्या लक्षवेधी लोगोचे अनावरण सोलापुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आ. सुभाष देशमुख आणि विविध क्षेत्रातील उपस्थित होते. आमदार आणि माजी वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा महोत्सव सोलापूरच्या सर्वांगीण विकासाची पायाभरणी करणार आहे.

सोलापूर जिल्ह्याच्या पर्यटनाचा सर्वांगीण विकास करणे आणि त्या माध्यमातून ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक, निसर्ग व ग्रामीण पर्यटनाचा प्रचार व प्रसार करणे या उद्दिष्टाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाची संकल्पना ‘5-पी मार्केटिंग ब्रँडिंग’ या तत्वावर आधारित असून प्लेसेस, पर्सनॅलिटीज,प्रॉडक्ट्स, प्लेसमेंट, पोल्युशन-फ्री एन्व्हायर्नमेंट या पाच महत्वपूर्ण ‘पी’भोवती त्याची विण आखली गेली आहे.

‘प्लेसेस’ म्हणजेच जिल्ह्यातील धार्मिक, सांस्कृतिक, औद्योगिक व ग्रामीण पर्यटन स्थळे; ‘पर्सनॅलिटीज’ म्हणजे सोलापुरातील कलाकार, संशोधक, आधुनिक शेतकरी, उद्योजक; ‘प्रॉडक्ट्स’ म्हणजे स्थानिक खाद्यसंस्कृती, कृषी उत्पादन व औद्योगिक निर्मिती; चौथा ‘पी’ म्हणजे प्लेसमेंटच्या माध्यमातून तरुणांसाठी जास्तीत जास्त रोजगारनिर्मिती आणि ‘पोल्युशन-फ्री एन्व्हायर्नमेंट’च्या माध्यमातून वृक्षलागवड व पर्यावरण संवर्धन! अशा या सर्वांगीण आणि सर्वसमावेशक अशा संकल्पनेतून हा विकास साकारणारण्याचे स्वप्न आहे.

या संकल्पनेचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी तोंड भरून कौतुक केले. सोमवारी ते सोलापूर शहराच्या दौर्‍यावर होते. त्यावेळी त्यांच्या हस्ते सोलापूर पर्यटन महोत्सवाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आ. सुभाष देशमुख, आ. विजयकुमार देशमुख, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. देवेंद्र कोठे, आ. समाधान आवताडे, आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद,  आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे व विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

सोलापूर पर्यटनाचा ब्रँड देशभरात उंचावणार

या पर्यटन महोत्सवामुळे सोलापूर जिल्ह्याच्या पर्यटन क्षमतेला नवे व्यासपीठ मिळणार असून त्यातून ग्रामीण व शहरी भागातील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे उद्गार श्री सुभाष देशमुख यांनी काढले. “शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये पर्यटनाविषयी जागरूकता निर्माण होईल. जिल्ह्यातील नागरिकांना पर्यटन क्षेत्राशी जोडले जाण्याची संधी उपलब्ध होईल. स्थानिक उद्योग व बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळेल. जिल्ह्यात रोजगार निर्मितीला गती मिळेल आणि त्यातून  या महोत्सवामुळे सोलापूर पर्यटनाचा ब्रँड राज्यभरात आणि देशभरात उंचावणार आहे,”  असेही श्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी या महोत्सवाच्या संकल्पनेचे कौतुक करून राज्य सरकारतर्फे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

Comments are closed.