NGN News
Latest Marathi News

रस्त्यांची चाळण सटाणावासियांना त्रस्त करणारी; ‘राष्ट्रवादी’ तर्फे रास्ता रोको

सटाणा : श्रीकांत रौंदळ

शहराच्या मध्यवस्तीतून जाणाऱ्या साक्री- शिर्डी तसेच मालेगाव रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्याने शहरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरील मोठमोठे खड्डे यामुळे शालेय विद्यार्थी, शेतकरी, सामान्य नागरिक तसेच दुचाकी स्वारांचे प्राण धोक्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्यावतीने आज बस स्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात शहर व परिसरातील नागरिक, पक्षाचे पदाधिकारी, विविध सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अधिकारी आणि ठेकेदारांच्या निष्क्रियतेमुळे वेळेवर दुरुस्ती न केल्याने रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था लक्षात घेता नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला होता. दरम्यान आंदोलन स्थळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी पोहोचताच आंदोलनकर्त्यांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करीत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आणि घटनास स्थळावरून हाकलून लावले. ज्यांच्या हातात रस्त्याची जबाबदारी आहे त्यांच्याशी चर्चा करायची अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. यामुळे प्रशासनाच्या अकार्यक्षमतेवर बोट ठेवण्यात आले.

सुमारे तासभर सुरू असलेल्या या आंदोलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. दरम्यान एका रुग्णवाहिकेला मार्ग मिळावा यासाठी आंदोलकांनी तातडीने रस्ता मोकळा करून दिला. यावेळी खड्डे मुक्त रस्ते करा, जनतेला वेठीस धरणे बंद करा अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

दरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रमोद टेंभोर नीकर व पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांची चर्चा केली. साक्री – शिर्डी महामार्ग व मालेगाव रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवले जातील असे आश्वासन त्यांनी दिल्यानंतर आंदोलन शांततेत मागे घेण्यात आले. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले.

या आंदोलनात माजी आमदार संजय चव्हाण, तालुकाध्यक्ष केशव मांडवडे, शहराध्यक्ष भारत काटके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चेतन वनीस, शहराध्यक्ष सुमित वाघ, माजी नगरसेवक मनोज सोनवणे, प*** सोनवणे, संजय पवार आदींनी भाषणे करीत निषेध व्यक्त केला. झिपरू सोनवणे, नथू सिंग वाघ, काकाजी झाल्टे, निंबा वानले यांचे सह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

Comments are closed.