NGN News
Latest Marathi News

आयुष भगतच्या कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत द्या

युवान प्रतिष्ठानची मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे मागणी

नाशिक रोड : एनजीएन न्यूज नेटवर्क

वडनेर दुमला येथे बिबट्याच्या हल्ल्यात जीव गमावलेल्या तीन वर्षीय आयुष भगत या निरागस बालकाचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने गावात शोककळा पसरली. दरम्यान, पीडित कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी युवान प्रतिष्ठान अध्यक्ष शाम गोहाड यांनी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सर्वसाधारण आर्थिक परिस्थिती असलेल्या भगत कुटुंबियांची मन:स्थिती आयुषच्या अकाली जाण्याने ढासळली आहे. ही बाब लक्षात घेवून राज्य शासनाने तातडीने त्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी गोहाड यांनी महाजन यांच्याकडे केली. याशिवाय, नाशिक जिल्ह्यात वाढलेल्या बिबट्यांच्या प्रमाणावर तातडीच्या व कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात, बिबट्यांची नसबंदी, दूरस्थ पुनर्वसन, गाव-शहर सीमारेषेवर सुरक्षा कुंपण, प्रकाशयंत्रणा व CCTV, तसेच २४x७ “बिबट्या सतर्कता हेल्पलाईन” सुरू करणे आदी मागण्याही यावेळी करण्यात आल्या.

सर्वतोपरी मदत करू : महाजन

दरम्यान, मंत्री महाजन यांनी पीडित कुटुंबाला सर्वतोपरी मदत करू असे आश्वासन दिले. तसेच बिबट्यांच्या वाढत्या प्रमाणावर ठोस व दीर्घकालीन उपाययोजना राबवू असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. सदर निवेदन देतेवेळी युवान प्रतिष्ठान अध्यक्ष शाम गोहाड यांच्यासह प्रशांत बारगळ, संकेत मालपाणी, ऋषिकेश वराह आदी उपस्थित होते.

———————————
“ही घटना केवळ एका कुटुंबाचा दु:खद प्रसंग नाही, तर संपूर्ण समाजासाठी गंभीर इशारा आहे. बिबट्यांच्या हल्ल्यांवर नियंत्रणासाठी शासकीय यंत्रणेने तातडीने व परिणामकारक पावले उचलली पाहिजेत.”

  • शाम गोहाड, अध्यक्ष, युवान प्रतिष्ठान, नाशिक रोड

Comments are closed.