NGN News
Latest Marathi News

ड्रोनच्या पंखावरून नदीचे सौंदर्य खुलले; निमगाव वाकडा ग्रा.पं चा अभिनव उपक्रम

लासलगाव : राकेश बोरा

पर्यावरण संवर्धन आणि ग्रामसौंदर्य यांचा संगम घडवणारा अभिनव उपक्रम निमगाव वाकडा ग्रामपंचायतीने यशस्वीरित्या राबवला आहे. ड्रोनच्या मदतीने शिव नदीपात्रातील पानवेलींचा नायनाट करून परिसराचे सौंदर्य पुन्हा खुलविण्यात आले आहे. यामुळे रेणुका माता मंदिर परिसर आगामी नवरात्रोत्सवात पर्यटक व बालगोपालांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.

रेणुका माता मंदिरासमोरील शिव नदीच्या पात्रात पानवेलींचे प्रचंड प्रमाण वाढले होते, ज्यामुळे परिसराची शोभा कमी होत होती. यावर उपाय म्हणून ग्रामपंचायतीने ड्रोनद्वारे औषधी फवारणी केली. प्रायोगिक तत्त्वावर केलेल्या या फवारणीनंतर अवघ्या पाच ते सहा दिवसांत पानवेली मोठ्या प्रमाणात जळाल्या, परिणामी नदीपात्र स्वच्छ व सुंदर दिसू लागले.

नवरात्रोत्सवाच्या काळात या परिसरात बालगोपालांसाठी बोटिंगची सुविधा असते. यावर्षी पानवेलींचा अडथळा दूर झाल्याने मुलांना मनसोक्त आनंद घेता येणार आहे. या उपक्रमासाठी ड्रोनची मोफत सुविधा सतीश कृषी सेवा केंद्राचे दत्तात्रय दरेकर यांनी उपलब्ध करून दिली. उपक्रमावेळी सरपंच सौ. पूजा दिगंबर दरेकर, दिगंबर दरेकर, संतोष पलोड, दत्तात्रय दरेकर, सोमनाथ निकम, दिलीप भोसले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया -सरपंच सौ. पूजा दरेकर 

गावच्या सौंदर्यासोबतच पर्यावरणाचीही काळजी घेतली पाहिजे, या उद्देशाने हा उपक्रम राबवला. गावकऱ्यांचा सहभाग आणि तंत्रज्ञानाचा वापर यामुळे हे शक्य झाले.

प्रतिक्रिया -संतोष पलोड (हरित सेना, लासलगाव)

@ ड्रोनच्या मदतीने पानवेली नष्ट करण्याची कल्पना कौतुकास्पद आहे. यामुळे मंदिर परिसर आकर्षक होईल आणि गावाच्या पर्यटनाला नवे बळ मिळेल.

Comments are closed.