NGN News
Latest Marathi News

माणिकरावांकडून अनोखी ओवाळणी..रोविंगपटू धनश्रीच्या आर्थिक जबाबदारीचे आश्वासन

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

जर्मनीत नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्समध्ये सिंगल स्कल रोविंग प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोविंगपटू कु धनश्री भास्कर सांगळे यांनी आज रक्षाबंधनाच्या दिवशी क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांना राखी बांधली. तसेच तिचा सत्कार करून अनोखी ओवाळणी देत तिला खेळण्यासाठी आर्थिक पाठबळ देण्याचे आश्वासन क्रीडामंत्री कोकाटे यांनी दिले.

सिन्नर तालुक्यातील पाटोळे या गावात धनश्री यांच्या जागतिक पातळीवरील मिळविलेल्या यशाबद्दल गावाच्यावतीने सत्कार समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमात राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री कोकाटे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात धनश्री आणि तिचे वडील भास्कर सांगळे, रेखा सांगळे,आजी पार्वताबाई केदार या कुटुंबातील सदस्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

यादरम्यान भाषण करताना मंत्री कोकाटे म्हणाले की “ज्या आजीने तुला वेळोवेळी पैसे पुरविले, त्या आजीने आणि तू मला आज रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधली आहे. त्यामुळे तू काळजी करू नकोस. राज्याचा क्रीडामंत्री हा तुझा भाऊ आहे. तुला कुठेही कमी पडू देणार नाही.” या कार्यक्रमाला क्रीडा उपसंचालक साळूंखे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments are closed.