NGN News
Latest Marathi News

भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्यांतील गोडवा वाढवा : स्वामी शांतिगिरीजी महाराज

  • ओझर येथे हजारो भाऊ बहिणींचा सामूहिक रक्षाबंधन सोहळा उत्साहात

ओझर : अमर आढाव

आपल्या भारतीय  संस्कृतीत भाऊ- बहिणीच्या पवित्र नात्याला विशेष महत्व आहे.मात्र  या नात्यातील दुरावा वाढत चालल्याचे अनेकदा पाहायला मिळते. रक्षाबंधनाच्या निमित्ताने प्रत्येक भावाने बहिणीच्या रक्षणाचा संकल्प करावा.बहिणीच्या अडचणीच्या काळात धावून जावे. आणि बहिणीनेही  हिस्सा मागून आपल्या भावाच्या संसारात अडचण निर्माण करू नये. असे सांगतांनाच बहीण-भावाच्या पवित्र नात्यातील गोडवा टिकून ठेवण्यासाठी  रक्षाबंधनाच्या निमित्ताने प्रत्येक भाऊ बहिणीने भेट म्हणून वृक्षारोपणासाठी  खास करून फळ झाडे द्यावे असे प्रतिपादन निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज धर्मपिठाचे पिठाधिश्वर अनंत विभूषित जगदगुरु  स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी केले.       

      जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने अनंत विभूषित जगदगुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने ओझर येथील देवभूमी ” जनशांती धाम” येथे हजारो भाऊ बहिणींच्या सामूहिक रक्षाबंधनाचा सोहळा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. संस्कार, एकोपा आणि सामाजिक ऐक्याचे जिवंत दर्शन यानिमित्ताने घडले.कार्यक्रमाचा प्रारंभ पहाटे भगवान बाणेश्वर महादेव व जगदगुरु बाबाजींच्या श्री मूर्तीचे अभिषेक पूजनाने करण्यात आला. यानंतर नित्य नियम विधी,आरती,सत्संग संपन्न झाला.चांदीच्या रथासह लक्षवेधी पालखी मिरवणूक संपन्न झाली.मातोश्री म्हाळसामाता व मातोश्री फुलामाता यांच्या पुण्यस्मरणार्थ ओझर येथे होणाऱ्या महिला धर्म सोहळ्याचे ध्वजारोहण मोठ्या उत्साहात संपन्न झाले.यानंतर आयोजित हजारो भाऊ बहिणींच्या सामूहिक रक्षा बंधन सोहळ्या प्रसंगी पंडित विलास गुरु कुलकर्णी व पंडित किरणगुरु लाडसावंगीकर यांच्या मंत्रघोषात हा सोहळा संपन्न झाला.यावेळी व्यासपीठावर जनेश्वरगिरीजी महाराज,प्रवक्ते विवेकानंद महाराज, ब्र.रामानंद महाराज,दिव्यानंद महाराज, श्रीपादानंद महाराज,दयानंद महाराज यांसह आश्रमीय संत उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमात सहभागी झालेल्या हजारो भाविकांना अनंत विभूषित जगदगुरु  स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, आपल्या भारतीय संस्कृतीत अनेक सण-उत्सव येत असतात मात्र बहीण-भावाच्या अतूट प्रेमाचा उत्सव म्हणजे रक्षा बंधनाचा वैशिट्यपूर्ण असा हा सोहळा असतो. भावाने  राखी पौर्णिमेच्या निमित्ताने बहिणीच्या रक्षणाचा आणि बहिणीच्या अडचणीच्या काळात मदत करण्याचा संकल्प करावा. तसेच बहिणींनी देखील आपल्याला सासरी हिस्सा मिळालेला असल्याने भावाकडे हिस्सा मागून भावाच्या संसारात अडचण निर्माण होईल असे वागू नये.“राखी हे बहीण भावाच्या पवित्र नात्याचे प्रतीक असून त्यामागे प्रेम, विश्वास आणि जबाबदारीचा भाव आहे. आजच्या युगात या मूल्यांचा वारसा जपणे आवश्यक आहे.आजच्या दिवसाची आठवण म्हणून प्रत्येक भाऊ बहिणीने वृक्षारोपण करण्यासाठी फळ झाडे भेट म्हणून द्यावे असेही यावेळी अनंत विभूषित जगदगुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज म्हणाले.संघबद्धतेचा हा पवित्र सोहळा भविष्यातही अधिक भव्य रूपात साजरा करण्याचा संकल्प जय बाबाजी भक्त परिवाराने व्यक्त केला.

यावेळी संपूर्ण परिसर ‘रक्षा बंधनाच्या’ पवित्रतेने भारावून गेला होता.यावेळी आश्रमीय संत,विश्वस्त मंडळ,कार्यकारी समिती,सल्लागार समिती व नियोजन समितीचे सदस्य व हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते.दर्शन व महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला.

Comments are closed.