NGN News
Latest Marathi News

करोडोंचा पोर्टल फेल, चार दिवसांत संवर्ग-4 बदल्यांचा बट्ट्याबोळ

लासलगाव : राकेश बोरा

प्राथमिक शिक्षकांच्या संवर्ग-4 मधील बदल्यांसाठी 5 ऑगस्टपासून सुरू झालेली ऑनलाइन प्रक्रिया अवघ्या चार दिवसांत कोलमडली आहे. विन्सेस कंपनीने विकसित केलेल्या पोर्टलसाठी शासनाने करोडो रुपये खर्च केले, पण ते सुरुवातीपासूनच गडबडले. लॉगिनसाठी ओटीपी उशिरा मिळणे, पेज लोड होण्यासाठी विलंब, सेव्ह केलेले पसंतीक्रम गायब होणे, अर्ज फायनल न होणे अशा तक्रारींनी शिक्षक हैराण आहेत.

बदल्यांच्या प्रक्रियेदरम्यानच 6 ते 8 ऑगस्टदरम्यान पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान चाचण्या घेण्याची जबाबदारी शिक्षकांवर आली. जास्त पटसंख्या असलेल्या शाळांत परीक्षा आणि बदली अर्ज या दोन्ही कामांच्या कोंडीत वेळापत्रक पूर्णपणे ढासळले. दहा-बारा वर्षे दुर्गम भागात सेवा दिल्यानंतर सुलभ शाळेची अपेक्षा ठेवणाऱ्या अनेक महिला शिक्षकांच्या यादीत फक्त दुर्गम शाळाच दिसल्याचे प्रकार घडले. जेष्ठतेचा मान न राखल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे.

शासनासमोर प्रश्नच प्रश्न

पोर्टल बिघाडामुळे अर्ज न भरता आलेल्यांना संधी मिळणार का?

पुन्हा पसंतीक्रम भरण्याची परवानगी मिळेल का?

मुदतवाढ दिल्यास शासन निर्णयातील कलम 4.5.1 मध्ये बदल होणार का?

फॉर्म फायनल न केलेल्यांची बदली थेट दुर्गम शाळांवर होणार का?

शिक्षकांचा ठाम आवाज – यंदा थांबा !

शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर बदल्या करणं विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम करतं. त्यामुळे यंदाची प्रक्रिया थांबवून पुढील वर्षासाठी सुसूत्र नियोजन करावे, अशी मागणी शिक्षकांनी केली आहे. अनेकांनी न्यायालयीन लढाईचा मार्ग स्वीकारला असून, बदल्यांची घाई याचाच परिणाम असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

Comments are closed.