NGN News
Latest Marathi News

नाशिक जिल्ह्यातील १८५ गावांमध्ये पर्यावरण संवर्धनाचा जागर

मविप्र समाजकार्य महाविद्यालय – राह फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

जिल्ह्यातील ११ तालुक्यांमधील १८५ गावांमध्ये पर्यावरण संवर्धन विषयक कार्य करण्याच्या उद्देशाने मराठा विद्या प्रसारक समाज संचलित समाजकार्य महाविद्यालय-नाशिक आणि राह फाउंडेशन-मुंबई यांच्यामध्ये सामूहिक वनहक्क व्यवस्थापन अंतर्गत नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे. मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, शिक्षणाधिकारी डॉ. नितीन जाधव, डॉ.भास्कर ढोके, प्राचार्य डॉ.विलास देशमुख,राह फाउंडेशनच्या उपाध्यक्षा शरयू कामत, प्रकल्पाचे जिल्हा व्यवस्थापक तुषार पिंगळे यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग आणि शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.

या कराराअंतर्गत १८५ गावांत जाऊन सामूहिक वन हक्क व्यवस्थापन समितीची स्थापना करणे तसेच त्या गावात ग्रामसभेच्या माध्यमातून पर्यावरण विकासाचा आराखडा तयार करणे ही कामे केली जाणार आहेत.यामध्ये सामूहिक वनहक्क व्यवस्थापन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी या कायद्यांतर्गत सरकारने ज्या गावांच्या ग्रामसभांना वनजमिनी सुपूर्द केल्या आहेत, त्यावर वन्यजीव व वन उत्पादने यांच्या वाढीसाठी आणि पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने लोकसहभागातून कामी केली जाणार आहेत. समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी या १८५ गावांमध्ये कायद्याविषयक जनजागृती करणार आहेत. हे विद्यार्थी प्रत्यक्ष या गावांमध्ये जाऊन गावाची भौगोलिक, पर्यावरणीय व वन उत्पादने विषयक माहिती जमा करणार असून, हा ४० पानी फॉर्म ॲपच्या माध्यमातून भरून घेतला जाणार आहे.

शासनाकडून सामूहिक वन हक्क समितीला गावातील मिळालेली वनजमीन प्रत्यक्ष पाहून त्याचा नकाशादेखील तयार केला जाणार आहे. गावातील सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपालिकेचे इतर पदाधिकारी, सामूहिक वन हक्क समितीचे अध्यक्ष आणि सदस्य यांच्या माध्यमातून शासनाच्या विविध खात्यांमार्फत वृक्ष लागवड करून तसेच विविध विकास योजनांचा आराखडा तयार करून प्रत्येक गावात पर्यावरण विकासाच्या दृष्टीने लोकसहभाग वाढविला जाणार आहे. यासाठी सामूहिक वनहक्क व्यवस्थापन अंतर्गत काम करणाऱ्या सर्व गावांनी सहकार्य करावे, असे आवाहन मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे आणि प्राचार्य डॉ. विलास देशमुख यांनी केले आहे. राह फाउंडेशनबरोबर मविप्रने केलेला करार नक्कीच नाशिक जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलून टाकल्याशिवाय राहणार नाही,असा विश्वासही मान्यवरांनी व्यक्त केला.

मुंबईतील टेकड्यांवर अडीच कोटी वृक्ष लागवड
राह फाउंडेशनने २०२२-२३ पासून त्र्यंबकेश्वर, नाशिक, चांदवड, इगतपुरी या तालुक्यांमध्ये आत्तापर्यंत एक लाख ७५ हजार पेक्षा जास्त झाडांची लागवड केलेली आहे. आजपर्यंत वड, पिंपळ, चिंच अशा मोठ्या झाडांची लागवड केली गेलेली आहे.संस्थेने सीएसआरच्या माध्यमातून साडेसात कोटींपेक्षा जास्त रुपये खर्च करून मुंबई शहराच्या आजूबाजूच्या अनेक टेकड्यांवर अडीच कोटी वृक्ष लागवड केलेली आहे. यावरून संस्थेच्या कामाची व्याप्ती लक्षात येते.

—————————–
@ पहिल्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील १८५ गावांमध्ये या कामाची सुरुवात करून लवकरच नाशिकचे जिल्हाधिकारी यांच्या सहकार्याने ही संख्या ८०० गावांपर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे. यासाठी राह फाउंडेशन, मविप्रचे विद्यार्थी, सेवक, सभासद आणि पालक वर्ग यांच्या सहभागाने सदर उद्दिष्ट गाठणे सहज शक्य आहे.
ॲड. नितीन ठाकरे, सरचिटणीस, मविप्र समाज, नाशिक.

Comments are closed.