NGN News
Latest Marathi News

पावसाळी गणना ! ‘महाराष्ट्राच्या भरतपूर’मध्ये सहा हजार पक्ष्यांची नोंद

  • वन विभाग-नेचर क्लब ऑफ नाशिकचा संयुक्त उपक्रम

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

‘महाराष्ट्राचे भरतपूर’ म्हणून बिरूद असलेल्या निफाड तालुक्यातील नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य परिसरात यंदा तब्बल सहा हजार पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. वन विभागाच्या वतीने दरवर्षी पावसाळ्यात ही नोंद करण्यात येते. परिसरातील सात ठिकाणांचा हा आलेख असल्याचे सांगण्यात येत आहे.

वन विभागाच्या माहितीनुसार, सदर गणना नांदूर मध्यमेश्वर गोदा नदीपात्र, कोठुरे, करड्गाव, काथरगाव आदी ठिकाणी करण्यात आली. प्राप्त निष्कर्षाप्रमाणे, पाणपक्षी आणि झाडावरील गवताळ पक्षी मिळून ६,९०० पक्षांची नोंद करण्यात आली. हिवाळी वातावरणात परिसरात देश-विदेशांतील पक्षांचे आगमन होवून वातावरण अधिकच मनोहारी होते. तीनशेपेक्षा अधिक जातीचे पक्षी, पाचशेहून अधिक वनस्पती आणि पासष्ट माश्यांच्या जाती या अभयारण्याची संपदा अधोरेखित करतात. अभयारण्याच्या विविध निरीक्षण मचाणांवरून पक्ष्यांची नोंद करण्यात आली. या मोहिमेत सहायक वनसंरक्षक हेमंत उबाळे, हिरालाल चौधरी, रुपेश दुसाने, नेचर क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा, उमेश नागरे, अमोल दराडे आदी सहभागी झालेत.

हे पक्षी आढळले ..

पक्षी गणना करताना काळा, पिवळा आणि लाल तपस, हळदी कुंकू, वारकरी, सूर्यपक्षी, रान बगळा, जांभळी आणि काळी पाणकोंबडी, शेकाट्या, खंड्या, उघड्या चोचीचा बगळा आदींचे दर्शन झाल्याचे वनाधिकारी म्हणाले.

Comments are closed.