NGN News
Latest Marathi News

‘इगतपुरी हायवे’ तर्फे ‘सेवा भाव ही सच्ची भक्ती है’ उपक्रमातून समाजरक्षकांचा गौरव

इगतपुरी : एनजीएन न्यूज नेटवर्क

इगतपुरी हायवे प्रायव्हेट लिमिटेड (आयएचपीएल) या कंपनीने ‘सेवा भाव ही सच्ची भक्ती है’ या आपल्या उपक्रमांतर्गत २५हून अधिक अल्पज्ञात समाजसेवकांचा सन्मान केला आणि त्यांच्या निःस्वार्थ सेवाभावाला मनापासून सलाम केला. या उपक्रमाच्या निमित्ताने वाडपे–गोंदे महामार्ग मार्गिकेवर स्वच्छता, सुरक्षितता आणि व्यवस्थापनासाठी सातत्याने काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचे, पालिका देखभाल कर्मचाऱ्यांचे, वाहतूक समन्वयकांचे आणि नागरी स्वयंसेवकांचे योगदान कंपनीने नुकतेच साजरे केले.

इगतपुरीत झालेल्या या गौरव समारंभाला विविध वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नाशिक येथील ‘पीआययू – एनएचएआय’चे प्रकल्प संचालक श्रीकांत दगे, कसारा पोलिस स्टेशनचे पीआयए सुरेश गावित आणि घोटी वाहतूक पोलिसांचे एपीआय राम वोंडे यांचा या अधिकाऱ्यांत समावेश होता. या मान्यवरांच्या उपस्थितीमधून महामार्गावर आणि परिसरात सातत्याने सेवा देणाऱ्या समर्पित व्यक्तींच्या कार्याबद्दलचा आदर आणि कृतज्ञता व्यक्त झाली.

याप्रसंगी बोलताना ‘आयएचपीएल’चे प्रकल्पप्रमुख हेमंत कुमार म्हणाले, “मुंबई–आग्रा महामार्गावरील वाडपे–गोंदे मार्गिका हा केवळ एक रस्ता नाही, तर नाशिक आणि मुंबई यांना जोडणारी ती एक जीवनवाहिनी आहे. आर्थिक वाढ आणि दैनंदिन जीवन यांच्याशी ती संबंधित आहे. आपण आज ज्या व्यक्तींना गौरवत आहोत, त्या या जीवनवाहिनीचे खरे रक्षक आहेत. मुसळधार पावसात रस्ते मोकळे ठेवणे असो, वाहतुकीची गर्दी सांभाळणे असो किंवा शालेय मुलांना धोकादायक रस्त्यावरून सुरक्षितपणे ओलांडून देणे असो – त्यांचे हे योगदान केवळ पायाभूत सुविधा देखरेखीपुरते मर्यादित नसून त्यात निःस्वार्थ सेवाभाव दिसतो. त्यांच्या या मौन पण अत्यंत मोलाच्या सेवेची दखल घेणे, हा आमच्यासाठी सन्मानच आहे.”

या समारंभात ज्यांना गौरवण्यात आले, त्यांमध्ये इगतपुरी नगरपालिकेच्या कचरा व्यवस्थापन विभागातील महादेव भोन्डे, इगतपुरी ग्रामीण रुग्णालयातील स्वच्छता कर्मचाऱ्यांमधील स्वप्नाली तावडे, कसारा ग्रामीण रुग्णालयातील स्वच्छता कर्मचारी संतोष राठोड, घोटी वाहतूक पोलिसांतील राम भोन्डे आणि शहापूर वाहतूक पोलिसांतील छाया कांबळे यांचा समावेश होता. छाया कांबळे या मुसळधार पावसातही हातात ‘स्टॉप’ फलक घेऊन शाळकरी मुलांना महामार्ग ओलांडण्यास मदत करतात. या आणि इतर गौरवप्राप्त व्यक्तींच्या कहाण्या लोकसेवा आणि नागरी अभिमान यांचे भक्कम उदाहरण व्यक्त करतात. प्रत्येक पुरस्कार विजेत्या व्यक्तीला कृतज्ञता प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांच्या सेवेचा सन्मान करण्यात आला.

आयएचपीएल ही कंपनी केवळ पायाभूत सुविधा तयार करण्यात आणि त्यांची देखभाल करण्यातच गुंतलेली नाही, तर ‘सेवा भाव ही सच्ची भक्ती है’ या उपक्रमाद्वारे सामुदायिक सहकार्य, जनजागृती आणि सेवेकऱ्यांप्रती आदर या संस्कृतीला वाढवण्याचे उद्दिष्टही तिने ठेवले आहे.

नाशिक हा जिल्हा सांस्कृतिक आणि व्यापारी केंद्र म्हणून वेगाने विकसित होत असताना, स्थानिक समुदायांना सक्षम करण्यावर आणि वाडपे–गोंदे मार्गिकेवर सेवाभावाचा प्रेरणादायी वारसा जपण्यावर ‘आयएचपीएल’चा अधिकाधिक भर राहणार आहे.

Comments are closed.