NGN News
Latest Marathi News

रामकुंडावरील वस्त्रांतर गृहावर हातोडा पडण्यावर शिक्कामोर्तब; पुरोहित संघाला नोटीस


नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

पुरोहित संघाकडे असलेली ३० ते ३२ लाखांची थकबाकी न मिळाल्याने रामकुंडावरील वस्त्रांतर गृह पाडकामासाठी प्रक्रिया सुरू झाली असून याबाबत पंचवटी विभागीय कार्यालयाने नोटीस पाठविली आहे.

प्राप्त माहितीनुसार, पुरोहित संघाकडे ३० ते ३२ लाखांची थकबाकी असल्याने तशी माहिती मनपा मिळकत विभागाने दिल्यानंतर महापालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयाने कारवाई केली. आगामी सिंहस्थाच्या तोंडावर पुरोहित संघाच्या अध्यक्षपदावरून वाद सुरू असतानाच आता वस्त्रांतर गृह पाडण्याच्या हालचालींनाही वेग आला आहे. १९९२ मध्ये कुंभमेळ्यावेळी बांधलेले वस्त्रांतरगृह कालांतराने ते पुरोहित संघाकडे गेले. त्यानंतरच्या दोन्ही कुंभमेळ्यावेळी वस्त्रांतरगृह ताब्यात घेण्याची मागणी झाली. गोदा संवर्धन बैठकीत राजेश पंडित यांनी गोदावरीच्या निळ्या पुररेषेतील बांधकामे हटविण्यासंदर्भात कारवाई होत नसल्याचा मुददा उपस्थित केला होता. या पुररेषेतील या बांधकामांबद्दल तक्रार करूनही कार्यवाही होत नसल्याचे बैठकीत सांगितले होते. त्यावर वस्त्रांतरगृह पाडकामाचा विषय कार्यवाहीत असून लवकरच त्यावर निर्णय घेतला जाईल, असे आयुक्त मनीषा खत्री यांनी सांगितले होते. त्यामुळे मिळकत विभागाने पुरोहित संघाला नाेटिस दिली असून त्याबाबत मनपा प्रशासन कधी कार्यवाही करणार याकडे लक्ष लागून आहे.

Comments are closed.