NGN News
Latest Marathi News

लासलगावी बससेवेचा बोजवारा; बस बिघाडामुळे विद्यार्थी परीक्षेला मुकले

भाजप आक्रमक; तीव्र आंदोलनाचा इशारा

लासलगाव : राकेश बोरा

लासलगाव येथील एस.टी. बस सेवेमधील बिघाडामुळे विद्यार्थ्यांना परीक्षांना मुकावे लागल्याची धक्कादायक घटना घडली. लासलगाव -येवला बस मध्ये बिघाड झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी वारंवार विनंती करूनही दुसरी बस देण्यात आली नाही. परिणामी लासलगाव बस स्थानकात प्रवाश्यांत प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली.

ग्रामीण भागात गेल्या अनेक महिन्यांपासून एस.टी. सेवा अक्षरशः कोलमडली असून, या अव्यवस्थेमुळे विद्यार्थी, महिला, वयोवृद्ध आणि रोजंदारी करणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष लासलगाव मंडळाने तीव्र संताप व्यक्त करत आगारप्रमुखांना निवेदन सादर केले.

भाजपने प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर जोरदार टीका केली असून, आगारप्रमुखांनी कार्यक्षमतेचा अभाव असल्यास नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ बदली व्हावी, अशी मागणी केली आहे. “प्रशासनाने तातडीने सुधारणात्मक उपाययोजना न केल्यास, लासलगावमध्ये तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा स्पष्ट इशारा भाजपच्या वतीने देण्यात आला आहे.

या आंदोलनात्मक निवेदन कार्यक्रमावेळी भाजप लासलगाव मंडळाध्यक्ष निलेश सालकाडे यांच्या नेतृत्वाखाली महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस स्मिता कुलकर्णी, निलेश जगताप, गणेश निकम, अनिल भागवत, ग्रामपंचायत सदस्या ज्योती निकम, लासलगाव शहर विकास समितीचे राजेंद्र कराड यांच्यासह अनेक विद्यार्थी आणि प्रवासी उपस्थित होते.

Comments are closed.