NGN News
Latest Marathi News

‘त्या’ निवृत्त आयुक्तांचे नाशिक, सटाणा कनेक्शन; कोट्यवधीची मालमत्ता आणि..

  • वसई-विरार महापालिकेत महत्त्वाच्या पदावर असताना अनेक वादग्रस्त निर्णय
  • अनिलकुमार पवार हे मंत्री दादा भुसेंचे भाचे जावई

मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क

सेवानिवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी सक्तवसुली संचलनालयाने म्हणजेच ‘ईडी’च्या रडारवर आलेल्या अनिलकुमार पवार यांच्या मालमत्तेचा आलेख चकित करणारा आहे. ईडीच्या छाप्यात पवार यांच्या नाशिकमधील घरात सव्वा कोटी रुपयांची कॅश सापडल्याची चर्चा आहे. याशिवाय, पवार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावे शेत जमीन, फॉर्म हाऊस तसेच प्लॉट असल्याचे सांगण्यात येत आहे.

वसई-विरार महापलिकेच्या हद्दीतील बेकायदा बांधकामांना छुपे प्रोत्साहन देण्याच्या प्रकरणात पवार यांच्यावर ‘ईडी’ ने कारवाई केली आहे. वसई-विरार महापालिकेत महत्त्वाच्या पदावर असताना अधिकारी मंडळींनी वाटेल तसा कारभार करून प्रचंड पैसे कमवित असल्याच्या तक्रार आहेत. याआधीही याच महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘ईडी’ने घेरले होते. ‘स्वराज्य अभियाना’चे प्रमुख धनंजय गावडे यांनी केलेल्या तक्रारी अनिल पवार यांच्याही नावाचा उल्लेख होता. गेल्या काही महिन्यात आयुक्त म्हणून पवार यांनी घेतलेल्या बहुतांशी निर्णयावर नाराजी होती. त्यामुळे त्यांचे निर्णय हे वादाच्या भोवऱ्यात होते. त्यात, महापालिकेतील सर्वच खात्यातील टेंडर प्रक्रियेत हस्तक्षेप वाढवून पवार यांनी प्रशासकीय ताकदीचा गैरवापर केल्याचे दिसत होते. महापालिकेच्या आयुक्तपदावरून पवार यांची काही दिवसांआधी बदली झाली. मुंबई विभागाच्या ‘एसआरए’च्या मुख्यकार्यकारी पदावर त्यांची नेमणूक झाली. मात्र, हा पदावर घेण्याआधी पवार यांनी महापालिकेत राहून काही फायल्स फिरवल्या. त्यात संशयास्पद असल्याची चर्चा आहे.

बारा ठिकाणी छापेमारी

मंगळवारी सकाळच्या सुमारास सटाणा शहरात इनोव्हा गाड्या आणि पोलीस असल्याने शहरात चर्चेचा विषय बनला होता. पवार यांनी सोमवारी आपल्या पदाचा पदभार सोडल्यानंतर मंगळवारी पहाटे त्यांच्या शासकीय निवासस्थानावर आणि त्यांच्याशी संबंधित नाशिक पुणे अशा एकूण बारा ठिकाणी ईडीने छापेमारी केली.

सुमारे 22 तास अनिलकुमार पवार व त्यांच्या कुटुंबियांची चौकशी सुरू होती. त्यांच्या पत्नी आणि मुलीला बोलावून चौकशी करण्यात आली. मात्र वसई पश्चिमेच्या ज्या शासकीय निवासस्थानी अनिल कुमार पवार होते, त्या ठिकाणी पवार यांनी सुरुवातीला ईडीच्या अधिकाऱ्यांना एक तास दरवाजा न उघडून रोखून धरले होते. त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी दरवाजा तोडून बंगल्यात प्रवेश केला. मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून सुरू झालेली ईडीची कारवाई बुधवारी पहाटे दीड वाजल्यानंतर ईडी अधिकारी या ठिकाणावरून निघून गेले.

पवार हे मंत्री भुसेंचे भाचे जावई

दरम्यान , अनिलकुमार पवार यांच्याशीसंबंधित मालमत्तांवर छापेमारी सुरु असतानाच आता त्यांचे राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसेंशी कनेक्शन असल्याची माहिती समोर येत आहे. पवार हे दादा भुसेंचे भाचे जावई आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या नियुक्तीसाठी दादा भुसे यांनी अनिल पवारसाठी आग्रह केला होता. या कारवाईचे धागेदोरे मंत्र्यापर्यंत जातात,असा आरोप खा. संजय राऊत यांनी केला आहे. भुसे यांनीही राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे. अनिलकुमार पवार यांची पोस्टींग एकनाथ शिंदे नाही तर उद्धव ठाकरेंच्या काळात झाली असल्याचे भुसे म्हणाले. ईडी ही स्वतंत्र न्यायव्यवस्था आहे.  न्याव्यवस्था योग्य कारवाई करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Comments are closed.