पुणे : एनजीएन न्यूज नेटवर्क
ऑफिसची मिटींग सुरु असताना ती मध्येच सोडून आयटी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या 23 वर्षीय अभियंत्याने टोकाचे पाऊल उचलल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. पुण्याच्या हिंजवडी आयटी पार्क येथील कंपनी कार्यालयाच्या इमारतीतील सातव्या मजल्यावरून उडी मारत मृत्यूला कवटाळले. पियुष अशोक कवडे असे या अभियंत्याचे नाव असून तो मूळ नाशिकचा होता. पियुष याच्या जाण्याने परिवारासह कंपनी कार्यालयात शोकाकुल वातावरण आहे.
पियुष साधारण वर्षभरापासून या कंपनीत काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. ऑफिस मिटींग सुरू असतानाच अचानक त्याच्या छातीत दुखत असल्याचे कारण सांगत तो तिथून निघून गेला आणि काही क्षणांनंतरच त्याने त्याच इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारत आयुष्य संपवले. या घटनेने उपस्थित प्रत्येकालाच हादरा बसला.
दरम्यान, घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली आहे. ‘मी आयुष्यात सर्वच बाबतीत अपयशी ठरलोय… मला माफ करा’, असे म्हणत वडिलांना उद्देशून आपल्या कृतींसाठी त्याने क्षमासुद्धा मागितली आणि आपण एक मुलगा म्हणून लायक नसल्याचे म्हणत स्वत:वर दोषारोपण केले आहे. पियुष कवाडे हा मूळ नाशिकचा राहणारा आहे.
Comments are closed.