NGN News
Latest Marathi News

देवळालीत सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या घरावर पुणे ‘जीएसटी’चा छापा

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

जीएसटी विभागाच्या पुणेस्थित गुप्तचर यंत्रणेने देवळालीत एका सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या घरावर छापा टाकल्याने शहरात खळबळ उडाली आहे. बनावट सॉफ्टवेअर तयार करून शासनाची फसवणूक केल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. श्रीकांत प्रसाद परे असे त्याचे नाव आहे.

आर्टिलरी सेंटर रोड, नाशिक रोडच्या कपालेश्वर इमारतीतील फ्लॅट क्रमांक १०४ येथे परे राहतात. चौकशी दरम्यान संशयिताकडून एक पिस्तूल आणि सहा जिवंत राऊंड जप्त करण्यात आले आहेत. यामुळे केवळ आर्थिक फसवणूकच नव्हे, तर शस्त्रास्त्र बाळगण्याच्या गुन्ह्याचाही तपास सुरु करण्यात आला आहे. करचुकवेगिरी व बनावट इन्व्हॉइस तयार केल्याच्या संशयावरून चौकशीचा फास आवळण्यात आला आहे. परे याच्या सॉफ्टवेअर कंपनीने विविध आयटी सेवा पुरवठा केल्याचा दाखला देऊन बनावट इन्व्हॉइस तयार केल्याचे सांगण्यात येत आहे. या माध्यमातून कोट्यवधींचा जीएसटी महसूल बुडवल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत कंपनीच्या आर्थिक व्यवहार आणि कागदपत्रांची कसून तपासणी करण्यात आली.

Comments are closed.