NGN News
Latest Marathi News

शासकीय आश्रमशाळेत शिक्षक अभाव; ग्रामस्थांनी शाळेला ठोकले कुलूप

सुरगाणा : वाजीद शेख

महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभागाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण अंतर्गत येणाऱ्या अनेक शासकीय आश्रमशाळांमध्ये गेल्या दीड महिन्यापासून शिक्षकच नाहीत शिक्षणाच्या मुलभूत हक्कावरच गदा येत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी अखेर आपल्या रोषाचा उद्रेक करत शासकीय आश्रमशाळा सराड तालुका सुरगाणा या शाळेला कुलूप ठोकले.

गेल्या अनेक दिवसांपासून पालक, विद्यार्थी व ग्रामस्थ आदिवासी आयुक्ताकडे पाठपुरावा करीत आहेत मात्र रोजंदारी शिक्षकांना नियुक्तीच्या बाबतीत प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत. परिणामी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत असल्याने ग्रामस्थांच्या संयमाचा बांध फुटला. विविध आदिवासी संघटना व स्थानिक स्तरावर झालेल्या बैठकीनंतर ग्रामस्थांनी ठाम निर्णय घेत शाळेला कुलूप लावले. यावेळी उपस्थित पालकांनी शासनाच्या उदासीन धोरणाचा तीव्र निषेध व्यक्त केला. “आमचं मूल शिक्षणापासून वंचित राहणार असेल, तर शाळा चालवायची गरजच नाही,” अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या.

आश्रमशाळा ही दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिक्षण व विकासाचं प्रमुख साधन आहे. मात्र, शिक्षकांची कमतरता ही या विद्यार्थ्यांच्या भविष्यावर गंभीर परिणाम घडवणारी बाब आहे. दरम्यान, संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने या समस्येकडे लक्ष देऊन शिक्षकांची नियुक्ती करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

या आंदोलनामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे पालक आता आपल्या मुलांच्या भविष्यासाठी सजग आणि लढण्यास सज्ज आहेत. शिक्षकांची तातडीने नियुक्ती झाली नाही, तर हे आंदोलन आणखी तीव्र स्वरूप घेईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
यावेळी सरपंच नामदेव भाेये, शिवसेना तालुका अध्यक्ष हरिभाऊ भाेये, कॉग्रेस तालुका अध्यक्ष सखाराम भाेये , सभापती जनार्दन भाेये, उपसरपंच अनिल गायकवाड, अदिवासी बचाव अभियान महिला संघटक सराेजताई भाेये, आनंदराव भाेये, काशिनाथ भाेये, दत्तू भाेये ग्रामपंचायत सदस्य ,पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया:———————————–

@ मी याच शाळेत शिकले, पण आजची परिस्थिती पाहून वाईट वाटतंय. शिक्षक नसल्यामुळे मुलांचं भवितव्य अंधारात जातंय.
दत्तू भोये
माजी विद्यार्थीनी

@ शाळा चालवायची असेल तर शिक्षक द्या, अन्यथा आम्ही ती बंद ठेवू. हा आमचा हक्क आहे.
जनार्दन भोये
शाळा व्यवस्थापन समिती सदस्य

@ दिवसेंदिवस शिक्षणाची स्थिती वाईट होत चाललीय. सरकारने तातडीने कारवाई केली नाही, तर हे आंदोलन अधिक तीव्र करावे लागेल.
सराेजताई भाेये,

Comments are closed.