
- पतीसह पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल
** एनजीएन न्यूज नेटवर्क
मेशी: भिला आहेर
देवळा तालुक्यातील वाखारी येथे बुधवारी (दि. २२) सायंकाळी एका तरुण विवाहित महिलेने दोन लहान मुलींसह विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. याबाबत विवाहितेच्या पतीसह पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून चार जणांना देवळा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास वाखारी (ता. देवळा) येथे मनीषा जयेश वाघ (३०) या विवाहित महिलेने आपल्या दोन मुली सिद्धी जयेश वाघ (७), खुशी जयेश वाघ (३) यांच्यासह घराजवळील शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच देवळा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन शोधकार्य सुरू केले. रात्री उशिराने तिघांचे मृतदेह मिळून आल्यावर शवविच्छेदनासाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी तिच्या व दोन्ही मुलींच्या मृत्यूस सासरकडील मंडळी जबाबदार असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले यावेळी पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांनी विवाहितेचा पती, सासू, सासरे, दीर आणि नणंदेवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केल्यानंतर सायंकाळी वाखारी येथील स्मशानभूमी तिघांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
—
मयत मनिषा हिस दोन्ही मुली झाल्याने तसेच माहेरून वेळोवेळी पैसे आणावेत यासाठी सासरच्या लोकांनी छळ करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले म्हणुन फिर्यादी भास्कर वाळुबा जाधव रा. राजदेरवाडी ता. चांदवड जि. नाशिक यांच्या फिर्यादीवरून पती जयेश रमेश वाघ, सासरा रमेश चिंतामन वाघ, सासू सुनंदा रमेश वाघ, दीर विकी रमेश वाघ सर्व रा. चिंचबारी-वाखारी रोड, वाखारी व नणंद सविता अजित बच्छाव रा. सायने ता. मालेगाव, जि. नाशिक यांच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पतीसह चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते याच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक नंदा पाटील ह्या करत आहेत.
Comments are closed.