NGN News
Latest Marathi News

नाशकात २४ तासांत १०० मिमी पाऊस, गंगापूर धरण ९५ टक्क्यांवर

  • नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; जिल्ह्यातील धरणांमधील एकूण पाणीसाठा ७० टक्क्यांवर

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, गेल्या २४ तासांत नाशिक शहरात तब्बल १०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. विशेषतः इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि नाशिक पश्चिम भागात पावसाचा सर्वाधिक जोर कायम असल्याने धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू आहे. परिणामी गंगापूर धरण ९५ टक्के, तर दारणा धरण ९० टक्के भरले असून, जिल्ह्यातील सर्व धरणांमधील एकूण पाणीसाठा ७० टक्क्यांवर पोहोचला आहे.

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अखंड संततधार सुरू असल्याने जलसंपदा विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून गंगापूर आणि दारणा धरणांतून नियंत्रित स्वरूपात पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे गोदावरी आणि दारणा नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली असून नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. नदीपात्रात अथवा पुराच्या पाण्यात उतरू नये, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येत असून, सकाळी ८.०० वाजता ३,१६५ क्यूसेक, ९.३० वाजता ४,२३६ क्यूसेक आणि १०.३० वाजता ५,२९५ क्यूसेक इतका विसर्ग करण्यात आला. पावसाचा वेग आणि धरणातील वाढणारा जलसाठा लक्षात घेता पुढील काही तासांत विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता जलसंपदा विभागाने व्यक्त केली आहे. पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला. काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी आल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. ग्रामीण भागातही नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून, प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवली आहे.

हवामान विभागाने पुढील २४ तासांतही नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, नदी-नाल्यांपासून सुरक्षित अंतर ठेवावे आणि प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

गंगापूर धरण व परिसरात कालपासून पाऊस सुरू असल्याने गंगापूर धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे धरणातून टप्प्या- टप्प्याने पाणी सोडण्यात येत आहे. आज सायंकाळपर्यंत गोदावरी नदीत पाणी सोडण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोदावरी नदी काठावरील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले आहे. आज दुपारी होळकर पुलावरून रामकुंड व गोदावरी नदी परिसरातील पुराची पाहणी केली. त्यावेळी विभागीय आयुक्त डॉ. गेडाम बोलत होते.

Comments are closed.