
- ‘सिटीलिंक’चा परीघ विस्तारणार; प्रवासी-केंद्रित करण्याच्या दृष्टीने हे महत्वपूर्ण पाऊल
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहराची प्रवासी सुविधा विस्तारण्याच्या दृष्टीने सद्यस्थितीतील ‘सिटीलिंक’च्या ताफ्यात ५० इ बसेस येणार आहेत. पीएम इ बस योजनेंतर्गत या बसेसना अनुदान मिळणार आहे. सुमारे पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नाशिककरांना ही सुविधा प्राप्त होणार आहे. शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक पर्यावरणपूरक, आधुनिक आणि प्रवासी-केंद्रित करण्याच्या दृष्टीने हे महत्वपूर्ण पाऊल समजले जात आहे.
शहरात सध्या सिटीलिंक बसेसची सेवा उपलब्ध आहे. तथापि, विविध कारणांमुळे या सेवेत दररोज लक्षावधी रुपयांचा तोटा सहन करण्याची अपरिहार्यता नाशिक महापालिकेला स्वीकारावी लागत आहे. सिटीलिंककडे सध्या सीएनजी व डिझेलवर धावणाऱ्या सुमारे २५० बसेस कार्यरत आहेत. नव्या ई-बसेस दाखल झाल्यानंतर प्रदूषणात घट होण्याबरोबरच इंधन खर्च कमी होईल आणि प्रवाशांना वातानुकूलित, शांत व अधिक आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळेल. या बसेससाठी आडगाव येथे आधुनिक ई-बस डेपो व चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहे. यामुळे बसेसचे चार्जिंग, देखभाल आणि संचालन अधिक कार्यक्षम पद्धतीने करता येणार आहे.
१०० इलेक्ट्रिक बसेस मिळणार
यापूर्वी केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या ऑपरेटर कंपनीसोबत कराराचा मसुदा अंतिम न झाल्यामुळे ई-बसेसची प्रक्रिया जवळपास वर्षभर रखडली होती. मात्र आता कराराचा मार्ग मोकळा झाल्याने पहिल्या टप्प्यातील ५० बसेस नाशिकला मिळणार असून, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आणखी ५० ई-बसेस उपलब्ध करून देण्याची योजना आहे. अशा प्रकारे शहराला एकूण १०० इलेक्ट्रिक बसेस मिळणार आहेत.
कुंभमेळा पार्श्वभूमीवर दिलासा
कुंभमेळा २०२७ दरम्यान लाखो भाविक आणि पर्यटक नाशिकमध्ये येणार असल्याने सार्वजनिक वाहतुकीवरील ताण मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ई-बसेसचा समावेश शहराच्या वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा देणारा ठरणार असून, भविष्यातील शाश्वत आणि हरित वाहतुकीच्या दिशेने नाशिकचे हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे
Comments are closed.