** एनजीएन न्यूज नेटवर्क
अज्ञानाचा आव आणि मानसशास्त्राचा चष्मा घरात, समाजात वावरताना आपण अनेकदा अशा लोकांना भेटतो, ज्यांना विषयाचं आलं-गेलं काहीही माहिती नसतं, पण ते एखाद्या तज्ज्ञासारखे छाती ठोकून मत मांडत असतात. उलटपक्षी, ज्या व्यक्तीकडे अफाट ज्ञान आणि अनुभव असतो, ती बोलताना अत्यंत नम्र, सावध आणि संकोची दिसतात. हे पाहून मनात प्रश्न येतो की, खरंच मूर्ख किंवा अज्ञानी लोकच जास्त आत्मविश्वासी असतात का?
मानसशास्त्राच्या दृष्टीकोनातून पाहिलं, तर ही केवळ एक म्हण किंवा भावना नसून एक सिद्ध झालेलं वैज्ञानिक सत्य आहे. डनिंग-क्रुगर इफेक्ट चा अभ्यास केल्यावर लक्षात येते की अज्ञानी, अडाणी, अशिक्षित आणि मूर्ख लोकं अती आत्मविश्वास बाळगून असतात. अश्या लोकांना स्वतःला सर्वज्ञानी समजण्याची जीं सवय लागलेली असते त्यामुळे ते आयुष्यात खूप मागे पडतात. कधीच कोणाची स्तुती करून, दुसऱ्याच ऐकून, इतरांच्या सल्ला अथवा मार्गदर्शन चा आदर करून स्वतः मध्ये बदल घडवणे, नवीन काही शिकणे अथवा स्वतःला सुधारणे यांना जमत नाही.
१९९९ मध्ये कॉर्नेल विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञ डेव्हिड डनिंग (David Dunning) आणि जस्टिन क्रुगर (Justin Kruger) यांनी या विषयावर एक महत्त्वपूर्ण संशोधन केलं. त्यांनी शोधून काढलेल्या या मानसशास्त्रीय सिद्धांताला ‘डनिंग-क्रुगर इफेक्ट’ म्हणतात.
या सिद्धांतानुसार, अल्पज्ञानाचा फुगा फुटायला वेळ लागत नाही. ज्या व्यक्तीकडे एखाद्या क्षेत्रातील ज्ञान अत्यंत कमी किंवा शून्य असतं, तिला आपल्या स्वतःच्या मर्यादांची जाणीवच नसते. खरं तर ते ज्ञान नसतंच ती फक्त माहिती असते. ही माहिती पण अत्यंत वरवर घेतलेली, कोणताही सखोल अभ्यास अथवा शहानिशा नं केलेली आणि कुठूनही कोणाकडून ही कानावर पडलेली किंवा वाचलेली असते. या प्रकारच्या लोकांना वाटतं की आपल्याला सगळ्या विषयातील सर्व काही समजते यालाच मानसशास्त्रात ‘मेटाकॉग्निटिव्ह स्किल्स’ची (Meta-cognitive skills स्वतःच्या क्षमतेचे आकलन करण्याची क्षमता) कमतरता म्हणतात. कोणताही विषय, कोणतीही घटना अथवा कोणीही व्यक्ती समजून घेणे, त्याचा खोलवर अभ्यास करून मगच त्यावर आपण मत प्रदर्शित करणे योग्य आहे याची जाणीव या लोकांना नसते.
या लोकांचं दुसरं लक्षण म्हणजे भ्रामक श्रेष्ठत्व (Illusory Superiority). अज्ञानी व्यक्तीला स्वतःच्या चुकीच्या निर्णयांची किंवा अज्ञानाची जाणीव करून घेण्याइतपतही ज्ञान नसतं. आपण चूक आहोत की बरोबर हे पडताळून पाहण्याइतकी बुद्धिमत्ता सुद्धा नसल्यामुळे त्यांच्यामध्ये एक ‘भ्रामक आत्मविश्वास’ तयार होतो.
‘माहिती असणे’ आणि ‘समज असणे’ यातील फरक लक्षात आला पाहिजे.
एखाद्या विषयाची जुजबी माहिती असणे आणि सखोल समज असणे यात मोठा फरक आहे. उदाहरणार्थ विमान आकाशात उडत हे जितके लोकं सांगू शकतात त्यातील किती टक्के लोकं विमान चालवू शकतात? समुद्र खोल असतो हे सगळ्यांना माहिती आहे पण कुशल मरीन इंजिनियर किती असतात? माउंट एवरेस्ट हे सगळ्यात उंच शिखर आहे हे देखील प्रत्येकाला माहिती आहे पण त्यातील किती टक्के लोकांनी ते चढले आहे? तेथील बारकावे अभ्यासले आहेत? त्यावर संशोधन केले आहे?आपल्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक विषयात लोकांकडून आपल्याला हाच फरक अथवा अभाव लक्षात येतो. म्हणूनच जोपर्यंत कोणत्याही विषयावर सखोल ज्ञान आपण स्वतः घेतलेले नाही तोपर्यंत त्या बद्दल कोणतेही मत देणे अजिबात योग्य नाही.
अज्ञानी व्यक्तीचा दृष्टिकोन कसा असतो हे समजावून घेणे गरजेचे आहे. एखाद्या विषयावर थोडीशी माहिती मिळाली की ती व्यक्ती मानून चालते की तो विषय अगदी सोपा आहे. तिची विचारप्रक्रिया अत्यंत साधी जसे की ब्लॅक अँड व्हाईट (सरळ-सोट) असते. गुंतागुंत न समजल्यामुळे शंका घ्यायला जागाच उरत नाही, आणि जिथे शंका नसते तिथे आत्मविश्वास प्रचंड दिसतो. ब्लॅक अँड व्हाईट मध्ये जो ग्रे एरिया असतो त्यावर बहुतांश लोकं विचार सुद्धा करू शकत नाहीत कारण त्यांची बुद्धी तेवढी परिपक्व नसते. उदाहरणं घ्यायचे झाले तर, आपण बघतो लोकं कुठल्याही व्यक्ती बद्दल, परिस्थिती बद्दल, वस्तू बद्दल अथवा ठिकाणाबद्दल बोलतांना एकदम मस्त आहे किंवा एकदम टुक्कार आहे असे अभिप्राय देतांना दिसतात. अगदी आपल्या जवळील लोकांबद्दल, स्वतःच्या परिस्थिती बद्दल सुद्धा लोकं खूपच वाईट आहे, जग खूप स्वार्थी आहे, तो प्रचंड चांगला आहे अथवा त्याच्या सारखा नालायक माणूस मी कधी पाहिलेला नाही अश्या प्रतिक्रिया देतात.
ज्ञानाचा प्रवास (Mount Stupid to Valley of Despair) कसा होतो हे आपण समजून घेवू. डनिंग-क्रुगरच्या आलेखात सुरुवातीच्या टप्प्याला ‘माऊंट स्टुपिड’ (Mount Stupid) म्हणतात. इथे ज्ञान कमी पण आत्मविश्वास शिखरावर असतो. जेव्हा माणूस पुढे शिकत जातो, तेव्हा त्याला विषयाच्या अथांगतेची जाणीव होते आणि त्याचा आत्मविश्वास अचानक खाली येतो. खूप बढाई मारणारे, खोटा मोठेपणा दाखवणारे, अजिबात समज नसलेल्या विषयावर छातीठोक पणे बोलणाऱ्या लोकांसमोर जेव्हा सत्य परिस्थिती अथवा सखोल माहिती येते तेव्हा ते पूर्ण ढासळून जातात.
अत्यंत हुशार लोक संकोची का असतात? (Impostor Syndrome) हे समजावून घ्या. फाजील आत्मविश्वास असलेले उतावळे लोकं ज्या पद्धतीने वागतात त्याच्या अगदी विरुद्ध हुशार लोकं असतात. विद्वान आणि हुशार लोक स्वतःच्या क्षमतेबद्दल सतत साशंक असतात. कोणताही विषय किती खोल असू शकतो त्याच्या अथांगतेची जाणीव ज्ञानी माणसाला असते.
त्यांना माहिती असतं की विषयामध्ये किती गुंतागुंत आहे, किती बाजू आहेत आणि आपल्याला अजून किती गोष्टी माहिती नाहीत. हुशार लोकं नाण्याला दोन बाजू असतात इतक्यावर समाधान मानत नाहीत तर नाण्याच्या अनेक बाजू आहेत या दृष्टीने विषय हाताळतात. विद्वान आणि अत्यंत बुद्धीवान लोक कोणत्याही परिस्थिती, व्यक्ती, घटना, घडामोडी बाबतीत उथळ पणे आपले मत मांडत नाहीत.
इम्पॉस्टर सिंड्रोम (Impostor Syndrome) या संकल्पनेचा अर्थ आपण जाणून घेवू. हुशार लोकांना अनेकदा वाटतं की आपल्याला जे जमतंय ते खूप सोपं आहे, त्यामुळे ते कोणालाही जमेल. हुशार लोकं नेहमी स्वतःच्या यशाचे श्रेय नशिबाला किंवा योगायोगाला देतात आणि बोलताना अतिशय नम्र किंवा सावध राहतात. हे लोकं कायम दुसऱ्याच म्हणणं समजून घेणे, ऐकून घेणे, प्रतिक्रिया नं देता प्रतिसाद देणे अश्या पद्धतीने वागतात. हुशार लोकांना त्यांच्या बुद्धिमत्तेच प्रदर्शन करणे आवडतं नाही.
या जगात अडचण अशी आहे की, मूर्ख लोक पूर्णपणे आत्मविश्वासी असतात, तर बुद्धिमान लोक शंकांनी भरलेले असतात. आजमितीला या मूर्ख लोकांच्या वागणुकीचे सामाजिक आणि व्यावहारिक परिणाम सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. कोणत्याही वैद्यकीय, राजकीय किंवा वैज्ञानिक विषयावर अर्धवट ज्ञान असलेले लोक तावातावाने भाषणं देतात, तर खरे तज्ज्ञ परिणामांचा विचार करून मोजकेच बोलतात. या अपुऱ्या ज्ञानाच्या साहाय्याने बोलणारे लोकं अनेक क्लिष्ठ, जटील, अवघड विषय जसे की आजारावर वैद्यकीय उपचार, ज्योतिष शास्त्र, तोडगे, उपाय, काळी जादू, भविष्य, राजकारण, समाज कारण, जाती, धर्म, परंपरा याबद्दल ज्ञान पाजळताना आपण बघतो. कोणताही सखोल अभ्यास नसताना सुद्धा कलम – कायदे, मानस शास्त्र, शैक्षणिक क्षेत्र यावर देखील बिनधास्त बोलतात. या लोकांच्या अती आत्मविश्वासाचा परिणाम समाजावर आणि निर्णय प्रक्रियेवर घातक ठरतो. विविध संवेदनशील विषयावर रिल्स विडिओ बनवणारे अनेक लोकं असे आहेत ज्यांनी फक्त लाईक्स, विइव्ह मिळवण्यासाठी वाटेल त्या विषयात हात घातला आहे. समाजाला प्रभावीत करण्यासाठी कोणताही विषय घेवून त्यात माल मसाला घालून हे अर्धवट लोकं प्रसिद्धी मिळवत असतात.
मूर्ख लोकंच आत्मविश्वासी असतात हे विधान १००% तंतोतंत खरं नसलं, तरी अपूर्ण ज्ञान हे अंध आत्मविश्वासाला जन्म देते हे मानसशास्त्रीय सत्य आहे. खरा आत्मविश्वास हा अज्ञानातून नव्हे, तर अनुभवातून, चुका स्वीकारण्यातून आणि निरंतर शिकण्याच्या वृत्तीतून येतो. म्हणूनच, जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचा अति-आत्मविश्वास वाटू लागेल, तेव्हा थांबून स्वतःला एक प्रश्न नक्की विचारला पाहिजे मला खरंच या विषयातलं सगळं माहिती आहे, की मी डनिंग-क्रुगर इफेक्टचा बळी ठरतोय? फक्त मनाला वाटलं म्हणून, काहीतरी ऐकलं अथवा वाचलं म्हणून तसेच एखाद्या व्यक्ती चा विरोध करायचा म्हणून, एखाद्याला मुद्दाम खोटं ठरवायचं म्हणून, बोलण्याची संधी मिळाली म्हणून स्वतःचे अज्ञान आणि अर्धवट बुद्धिमत्ता पाजळल्यास लोकांमध्ये हास्यस्पद गोष्ट होते.
काउन्सिलर मीनाक्षी जगदाळे
9766863443
Comments are closed.