NGN News
Latest Marathi News

बाप-लेकाचा करूण अंत; वाडीवऱ्हेजवळ डोहातील दुर्घटना

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : डोहातील पाण्यात पोहत असलेल्या वडिलांना पाहून पाण्यात उतरलेल्या १४ वर्षीय मुलाचा पाण्याच्या वेगवान प्रवाहात तोल गेला. मुलगा बुडत असल्याचे लक्षात येताच त्याला वाचविण्यासाठी वडिलांनी पाण्यात धाव घेतली; मात्र मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात वडिलांचाही पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मुलगा मात्र प्रवाहासोबत वाहून गेल्याने बेपत्ता झाला आहे. ही हृदयद्रावक घटना गुरुवारी (दि. २४) सायंकाळी सहाच्या सुमारास पहिने बारी ते वाडीवऱ्हे रस्त्यालगतच्या डोहात घडली.

संजय धोंडू सोनवणे (४८, रा. अक्षय चौक, नवीन नाशिक) असे मृत वडिलांचे नाव आहे. त्यांचा १४ वर्षीय मुलगा श्री सोनवणे हा अद्याप बेपत्ता आहे. संजय सोनवणे डोहात पोहत असताना मुलानेही त्यांना पाहून पाण्यात उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र, डोहातील पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने काही क्षणांतच तो पाण्यात बुडू लागला. मुलगा संकटात असल्याचे लक्षात येताच संजय सोनवणे यांनी क्षणाचाही विलंब न करता त्याच्याकडे धाव घेतली. मात्र, पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे मुलाला वाचविताना ते स्वतःच पाण्यात बुडाले.

घटनेची माहिती मिळताच वाडीवऱ्हे पोलिस आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तातडीने शोधमोहीम सुरू करण्यात आली. रात्री साडेसातच्या सुमारास संजय सोनवणे यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले. दरम्यान, प्रवाहात वाहून गेलेल्या १४ वर्षीय मुलाचा शोध घेण्यासाठी पोलिस आणि बचाव पथकाकडून रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती.

Comments are closed.