NGN News
Latest Marathi News

अरेरे ! द्राक्षोत्पादक शेतकऱ्याचे कर्जबाजारीपणामुळे टोकाचे पाऊल

  • निफाडच्या खडक माळेगाव सोसायटीचे माजी चेअरमन संतू रायते यांची आत्महत्या;  परिसरात हळहळ

** एनजीएन न्यूज नेटवर्क

लासलगाव : राकेश बोरा

निफाड तालुक्याच्या उत्तर-पूर्व पट्ट्यातील द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या खडक माळेगाव येथील प्रगतशील शेतकरी तथा खडक माळेगाव सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन संतू कचरू रायते (५७) यांनी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. शेतीतील आर्थिक अडचणी आणि कर्जबाजारीपणामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, या घटनेने खडक माळेगावसह संपूर्ण निफाड तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

निफाड तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थितीचे सावट असताना तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश न झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने शेतकरी संकटाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शेतीचा वाढता उत्पादन खर्च, हवामानातील अनिश्चितता, पिकांवरील रोगराई आणि शेतीमालाच्या बाजारभावातील चढ-उतार यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी वाढत असल्याची चर्चा परिसरात आहे.

खिशात आढळली चिठ्ठी

या घटनेची नोंद लासलगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. घटनास्थळाच्या पंचनाम्यादरम्यान रायते यांच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आली आहे. कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करण्याचा निर्णय घेत असल्याचा तसेच आपल्या निर्णयासाठी कुटुंबीयांना दोषी धरू नये, असा आशय चिठ्ठीत असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.

‘संतू पाटील’ नावाने परिचित

संतू रायते हे परिसरात ‘संतू पाटील’ या नावाने परिचित होते. मनमिळावू स्वभाव आणि सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध यामुळे त्यांचा मोठा परिचयाचा गोतावळा होता. त्यांनी खडक माळेगाव सहकारी सोसायटीचे चेअरमनपदही भूषविले होते. द्राक्ष हंगामात व्यावसायिक तसेच द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांशी त्यांचे घनिष्ठ संबंध असल्याने निफाड तालुक्यासह परिसरात त्यांचा मोठा परिचय होता.

‘कॅलिफोर्निया’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पट्ट्यात शोककळा

निफाड तालुक्याचा उत्तर-पूर्व पट्टा निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे या परिसराला ‘कॅलिफोर्निया’ म्हणूनही संबोधले जाते. अशा शेतपट्ट्यातील प्रगतशील शेतकऱ्याच्या मृत्यूने द्राक्ष उत्पादक शेतकरी वर्गालाही मोठा धक्का बसला आहे.

शेतीसाठी उभारलेले भांडवल, वाढता उत्पादन खर्च, हवामानातील बदल, निर्यात बाजारातील अनिश्चितता आणि अपेक्षित मोबदला न मिळणे यामुळे द्राक्ष उत्पादकांसमोरील आर्थिक जोखीम वाढत असल्याचे शेतकरी सांगतात. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींचा गांभीर्याने विचार करून प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

रविवार (दि. २७) रोजी खडक माळेगाव येथे संतू रायते यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ, शेतकरी, व्यापारी तसेच विविध क्षेत्रांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ व बहीण असा परिवार आहे.

Comments are closed.