NGN News
Latest Marathi News

दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत NEDA चा रक्षाबंधन उपक्रम

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : नाशिक इव्हेंट्स अँड डेकोर असोसिएशन (NEDA) तर्फे विद्या प्रबोधिनी स्कूलमधील दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी NEDA सदस्यांना प्रेमाने राखी बांधून रक्षाबंधनाचा आनंद साजरा केला. या प्रेमाच्या बंधाला समाजसेवेची जोड देत NEDA च्या वतीने शाळेला वॉटर प्युरिफायर भेट देण्यात आला. विद्यार्थ्यांना शुद्ध तसेच गरम व थंड पाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी, हा या भेटीमागील उद्देश होता.

यावेळी NEDA चे अध्यक्ष प्रवीण कमले यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. रक्षाबंधनासारख्या सणाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांशी आपले नाते अधिक घट्ट होते. अशा उपक्रमांमधून सामाजिक बांधिलकी जपण्यासोबतच आनंदाचे क्षणही सर्वांसोबत साजरे करता येतात, असे त्यांनी सांगितले.

NEDA चे सचिव तुषार श्रीवास्तव यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांना आत्मविश्वासाने पुढे जाण्याचा संदेश दिला. अडचणींना न घाबरता मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असे आवाहन करत “तुम्ही कुणापेक्षा कमी नाही; तुमच्यातही मोठी स्वप्ने पूर्ण करण्याची ताकद आहे,” असे त्यांनी सांगितले. त्यांच्या संवादामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

या उपक्रमासाठी NEDA सदस्य रजत शर्मा यांनी पुढाकार घेत विशेष योगदान दिले. त्यांच्या या समाजोपयोगी पुढाकाराचे विद्या प्रबोधिनी स्कूलच्या वतीने तसेच उपस्थित NEDA पदाधिकारी, सदस्य आणि मान्यवरांनी कौतुक केले. सामाजिक कार्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार प्रेरणादायी असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी NEDA चे उपाध्यक्ष कुणाल जग्गी यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या विद्या प्रबोधिनी स्कूलच्या अध्यक्ष धवळे मॅडम, सचिव वैद्य सर, मुख्याध्यापक देवरे मॅडम, शिक्षकवर्ग आणि विद्यार्थ्यांचे त्यांनी आभार व्यक्त केले. तसेच उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या NEDA च्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचेही त्यांनी आभार मानले.

कार्यक्रमाला NEDA चे प्रवीण कमले, रूपेश गुप्ता, कुणाल जग्गी, तुषार श्रीवास्तव, मनोज उपाध्याय, रजत शर्मा, सचिन पुरोहित, पूनम उपाध्याय, सरफराज सैय्यद, मोनाली आहिराव, नीता कुलकर्णी, हर्षदा वैशंपायन, अंकुश बोरा, रोशन देशमुख, सागर जैन आणि प्रतीक सपकाळ यांच्यासह NEDA चे सदस्य उपस्थित होते.

“राखीच्या बदल्यात शुद्ध पाण्याची भेट” या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून रक्षाबंधनाचा आनंद आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम घडून आला.

Comments are closed.