NGN News
Latest Marathi News

मानसिकदृष्ट्या दरिद्री लोक कसे ओळखावेत ( विशेष/मीनाक्षी जगदाळे)

** एनजीएन न्यूज नेटवर्क

मानसिक दृष्टीने दरिद्री असणे म्हणजे पैशांची अथवा भौतिक गोष्टींची कमतरता नसून विचारांची, दृष्टिकोनाची आणि भावनांची गरिबी असणे होय. अशी मानसिकता असलेल्या व्यक्ती सकारात्मकता, समाधान आणि इतरांच्या प्रगतीचा स्वीकार करू शकत नाहीत.

या लेखामार्फत आपण प्रथम मानसिकदृष्ट्या दरिद्री लोकांना ओळखण्याची लक्षणे जाणून घेवू. या लोकांना सतत कोणत्याही गोष्टी बाबत तक्रार करण्याची सवय असते. हे लोक परिस्थिती, हवामान, सरकार, मूलभूत सुविधा, साधन, सामुग्री किंवा इतरांना सतत दोष देतात त्यामुळे असे लोकं समाधानी कधीच नसतात. संकुचित आणि संशयी वृत्ती या लोकांच्या मनात भरलेली असते. इतरांच्या यशामागे काहीतरी वाईट हेतू असेल, जे यशस्वी झालेत त्यांनी काहीतरी चुकीचा मार्ग निवडला असेल, यांच्या यशा मागे काहीतरी राजकारण असेल असा संशय कमकुवत विचार सरणी असलेल्या लोकांना कायम येत असतो. आपल्याला फसवून, लुबाडून अथवा आपला गैर फायदा घेवून इतर लोकं मोठे होत आहेत असे विचार या लोकांच्या डोक्यात कायम सुरू असतात.

जेलसी म्हणजेच मत्सर आणि तुलना म्हणजेच स्वतःकडे काय आहे यापेक्षा इतरांकडे काय आहे यावर लक्ष ठेवून सतत जळफळाट करण्याची वृत्ती अश्या लोकांमध्ये असते. इतर लोकांच्या प्रगती वर अथवा दुसऱ्याच काही चांगल झाल की या लोकांना खूप त्रास होतो त्यामुळे इतरांचे कौतुक, अभिनंदन करण्यापेक्षा हे लोकं त्याच्या इतर उणीवा अथवा कमतरता शोधून त्या मार्फत त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतात.

या लोकांची अजून एक चुकीची सवय म्हणजे कोणत्याही बदलाचा तीव्र विरोध करणे. स्वतः काही नवीन गोष्टी शिकणे, स्वतःमध्ये सुधारणा करणे किंवा नवीन विचार स्वीकारणे यांना कधीच जमत नाही. नवीन नाती, नवीन ओळखी, नवीन वस्तू, नवीन चाली रीती, नवीन पद्धती, नवीन किंवा बदलती जीवन शैली अथवा नवीन ठिकाण तेथील दिनचर्या या सारख्या गोष्टी स्वीकाराने सुद्धा यांना जड जाते.

वैचारिक दारिद्र्य असलेल्या लोकांमध्ये कृतज्ञतेचा (Gratitude) अभाव मोठया प्रमाणात आढळतो. असे लोकं आपल्या आयुष्यात मिळालेल्या चांगल्या गोष्टींबद्दल कधीही आभार मानत नाहीत त्यामुळे ते आनंदी अथवा समाधानी राहत नाहीत तर ते नेहमी कमतरतेवरच भर देतात. आपल्या कडे जे जे नाही त्याबद्दल सतत बोलून त्यामुळे आपल्याला कसा त्रास आहे हेच सांगण्याचा या लोकांचा प्रयत्न असतो. सातत्याने असमाधान व नाराजी असल्याने या लोकांना आयुष्याचा आनंद उपभोगता येत नाही.

वैचारिक दारिद्र्य असलेल्या लोकांचे मानसशास्त्र समजून घेतल्यास हा विषय समजणें आपल्याला सोपे जाईल.
या मानसिकतेमागे प्रामुख्याने ‘स्कार्सिटी माइंडसेट’ किंवा अभावाची मानसिकता असते. अश्या लोकांना वाटते की जगात यश, आनंद आणि संसाधने मर्यादित आहेत; त्यामुळे दुसऱ्याला काही मिळाले तर आपले नुकसान होईल अशी भीती त्यांना सतावते. लहानपणी कोणत्याही कारणास्तव मिळालेली असुरक्षिततेची भावना, अपयशाची भीती, आणि स्वतःच्या क्षमतेवर, कर्तृत्वावर अविश्वास यामुळे ही मानसिकता घट्ट होते. स्वतःला नेहमी ‘पिडीत’ (Victim) मानणे आणि स्वतःची जबाबदारी न घेणे, स्वतःच्या चुकांचा स्वीकार नं करणे हा यांच्या मानसशास्त्राचा मुख्य भाग असतो. या लोकांना कायम असे वाटतं असते की आपल्यावर इतरांनी अन्याय अत्याचार केलेला आहे, सर्व दुःख त्रास फक्त आपल्याच वाट्याला आलेले आहे, सर्व बाजूने आपलेच नुकसान झाले आहे, आपल्या चांगुलपणा चा लोकांनी फायदा घेतला आहे, गरज संपल्यावर आपल्याला सोडून दिले आहे.

आपल्या घरात, नात्यात, समाजात या प्रकारची अनेक लोकं असतात त्यामुळे अशा लोकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा?हे आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. पहिले तर हे लक्षात ठेवावे की या लोकांमध्ये कधीही मनापासून खोलवर भावनिक गुंतवणूक करण्यात अर्थ नसतो. अश्या लोकांशी भावनिक अंतर ठेवणे मर्यादित संवाद ठेवणे, फक्त कामापुरते आणि मुद्यावर बोलणे आपल्या फायद्याचे असते. या लोकांशी जास्त गप्पा गोष्टी संभाषण करत राहिले तर ते सतत स्वतःवर झालेला अन्याय, अत्याचार सांगणे, इतरांची निंदा करणे , दुसऱ्यांना दोष देणे, इतरांबद्दल सतत बदनामी कारक बोलणे आपण कसे पीडित आहोत याच विषयावर बोलतील. या लोकांच्या नकारात्मक चर्चेत अजिबात सहभागी नं होणे हा उत्तम पर्याय आहे.

अश्या लोकांना नाही म्हणायला शिका, या लोकांच्या तक्रारींचे किंवा नकारात्मक विचारांचे केंद्र बनू नका, गरज पडल्यास स्पष्टपणे विषय बदला. या लोकांच्या सानिध्यात, संपर्कात राहिल्यास आपली मानसिकता देखील नकारात्मक होते, आपला आत्मविश्वास कमी होतो आणि आपल्यालाच हे लोकं अपराधी असल्याची भावना देतात.

या प्रकारच्या लोकांशी वागता बोलताना सीमारेषा ठरवणे खूप गरजेचे आहे. तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय, आनंद आणि प्लॅन्स यांच्याशी शेअर करणे टाळा. तुम्ही काय काम करता, तुमचं उत्पन्न किती, तुम्हाला समाजात काय ओळख आहे, तुमची प्रतिमा, अनुभव, तुमचे पद प्रतिष्ठा याबद्दल अश्या लोकांशी अजिबात चर्चा करू नका. हे लोकं त्यांच्या स्वभावानुसार तुम्हाला प्रोत्साहन देण्याऐवजी तुमचं मानसिक खच्चीकरण करतील.

या लोकांशी वागता बोलताना त्यांनी त्यांच्या स्वभावानुसार कितीही चुकीची विधाने केली, तुमच्या वर आरोप केले तरी प्रतिक्रिया देण्याऐवजी शांत राहा. हे लोकं तुम्हाला नकारात्मक प्रवाहात ओढण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही शांत राहून स्वतःची ऊर्जा वाचवा.

हा लेख वाचल्यावर आपल्या लक्षात आले असेल वैचारिक दारिद्र्य असलेले लोकं, त्यांचे स्वभाव आणि वर्तन कसे असते. जर आपण स्वतः असे असाल अथवा आपल्या आजूबाजूला कोणी असे असेल तर हि मानसिकता बदलण्यासाठी त्यांनी स्वतः करायच्या उपाययोजना आपण बघू. कृतज्ञता व्यक्त करणे खूप महत्वाचे आहे. रोज रात्री झोपताना आयुष्यात मिळालेल्या पाच चांगल्या गोष्टी लिहून काढण्याची सवय लावावी. तुलना करणे ताबडतोब बंद करणे आवश्यक आहे. स्वतःची तुलना फक्त स्वतःच्या कालच्या रूपाशी करावी, इतरांशी नाही.

‘ग्रोथ माइंडसेट’चा स्वीकार “मला सर्व येते” ऐवजी “मला नवीन गोष्टी शिकायच्या आहेत” हा दृष्टिकोन ठेवावा. मीच सगळ्यात शहाणा आहे मला कोणी काही शिकवू नये हा पवित्रा सोडावा. नकारात्मक संवादावर नियंत्रण ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करावा. स्वतःच्या विचारांचे निरीक्षण करावे; जेव्हा मनात तक्रार येईल, तेव्हा त्याचा सकारात्मक पर्याय शोधावा.

अश्या लोकांनी स्वतः साठी सकारात्मक वातावरणाची निवड करणे अपेक्षित आहे. दर्जेदार स्वरूपाचे वाचन करणे, चांगल्या विषयावर आधारित चित्रपट, नाटक बघणे. प्रेरणादायी व्यक्तींचे विचार ऐकणे आणि प्रगतीशील नातेवाईक, मित्रांच्या संगतीत वेळ घालवणे गरजेचे आहे. दररोज आपण किती नवीन लोकांना भेटलो, नव्याने किती चांगली व्यक्तिमत्व आपल्याला जोडली गेलीं याचा अभ्यास करावा. इतर चांगल्या लोकांकडून आपण दररोज काय नवीन शिकलो? नवीन चांगली कोणती सवय आत्मसात केली यावर विचार करावा. त्याच त्याच ठरलेल्या बोटावर मोजता येणाऱ्या लोकांशीच आपण तेच तेच विषय कायम बोलत असू तर आपली प्रगती पूर्ण थांबली आहे हे समजून घ्या. वर्षानुवर्षे तुम्ही एकच विषय अनेकदा ठराविक लोकांशी बोलत बसला असाल तर तुम्ही आयुष्यातला खूप मौल्यवान वेळ वाया घालवत आहात हे लक्षात घ्या. बुद्धीवान, अनुभवी, सुसंस्कृत, समंजस समाजात सक्रिय असणाऱ्या लोकांच्या समूहात राहणे सुरू करावे.

मानसिक दरिद्रतेतून बाहेर पडणे एका रात्रीत शक्य नाही, पण स्वतःच्या विचारांनी जाणीव ठेवून केलेले प्रामाणिक प्रयत्न आपल्याला समृद्ध आणि समाधानी जीवन जगण्यास मदत करतात. इतरांचे उणे दुणे काढणे, इतरांना नावे ठेवणे यापेक्षा आपण आपल्यातील कमतरता ओळखून त्यावर काम केल्यास निश्चितच आपले आयुष्य सुखकर होईल.

काउन्सिलर मीनाक्षी जगदाळे
9766863443

Comments are closed.