
- राज्यातील ज्वलंत प्रश्नांवर होणार निर्णायक भूमिका, मान्यवरांची राहणार उपस्थिती
- मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या शुभहस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग, ‘छावा गौरव पुरस्कार’प्रदान करून सामाजिक कार्यकर्त्यांचा होणार सन्मान
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक | छावा क्रांतिवीर सेनेचे १२ वे राष्ट्रीय महाअधिवेशन रविवार, दि. २८ जून रोजी सायंकाळी ६.०० वाजता रावसाहेब थोरात सभागृह,नाशिक येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न होणार आहे.संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या महाअधिवेशनाकडे राज्यभरातील सामाजिक,राजकीय आणि शेतकरी संघटनांचे विशेष लक्ष लागले आहे.
या अधिवेशनाला मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे आशीर्वाद लाभणार असून,छत्तीसगड येथील माँ मातंगी धामचे श्री श्री डॉ. प्रेमासाई महाराज यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योगमंत्री नामदार उदय सामंत यांच्या हस्ते होणार असून,कामगार नेते अभिजीत राणे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.
यावेळी नामदार दादा भुसे,आमदार सुहास (अण्णा) कांदे, आमदार देवयानी फरांदे,आमदार सीमा हिरे,महापौर हिमगौरी आडके,उपमहापौर विलास अण्णा शिंदे,ज्येष्ठ नेते सुनील भाऊ बागुल,मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे,माजी स्थायी समिती सभापती शिवाजी सहाने,भाजप प्रवक्ते अजित चव्हाण यांच्यासह विविध सामाजिक, शैक्षणिक,उद्योग,सहकार व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
अधिवेशनामध्ये महाराष्ट्रभरातील सामाजिक,शैक्षणिक,कृषी, उद्योग,आरोग्य,युवा आणि जनसेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा ‘छावा गौरव पुरस्कार’ प्रदान करून सन्मान करण्यात येणार आहे.
छावा क्रांतिवीर सेना गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी,कामगार, विद्यार्थी,महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी आंदोलन,मोर्चे, निवेदने व कायदेशीर लढ्याच्या माध्यमातून सातत्याने न्याय मिळवून देण्याचे कार्य करत आहे.या वर्षभरातील संघटनेच्या कार्याचा आढावा अधिवेशनात सादर करण्यात येणार असून,आगामी वर्षासाठीच्या संघटनात्मक वाटचालीबाबत महत्त्वाचे ठराव मंजूर केले जाणार आहेत.
याशिवाय,सध्या राज्यात चर्चेत असलेल्या नाशिक रिंगरोड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न,शेतकरी कर्जमाफी,महाराष्ट्रातील घरकुल योजनांतील कथित गैरव्यवहार,तसेच स्मार्ट मीटरच्या सक्तीच्या बसविण्याविरोधातील जनआंदोलन यांसारख्या ज्वलंत विषयांवर संघटनेची भूमिका स्पष्ट करण्यात येणार आहे. राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना या प्रश्नांबाबत शासनाचे लक्ष वेधून न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेच्या वतीने पुढील आंदोलनाची दिशा देखील जाहीर केली जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
या अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हाप्रमुख आशिष हिरे, ग्रामीण जिल्हाप्रमुख नवनाथ वैराळ, महानगर प्रमुख योगेश गांगुर्डे, प्रदेश कार्यकारणी मधील शिवाजी राजे मोरे, शिवा तेलंग, नवनाथ शिंदे, सुभाष गायकर, डॉ किरण डोखे, गिरीश आहेर, गोरख संत, मनोरमा ताई पाटील, संगीता ताई सूर्यवंशी, प्रवीण पाटील, वैभव दळवी, सागर जाधव, दिनेश जाधव, योगेश पाटील, नारायण बाबा जाधव, ॲड नवनाथ कांडेकर, प्रशांत सूर्यवंशी, आबा पाटील तसेच नाशिक जिल्ह्यातील जिल्हाप्रमुख, महानगरप्रमुख,तालुकाप्रमुख,विभागीय पदाधिकारी,प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य आणि राज्यभरातील पदाधिकारी युद्धपातळीवर तयारी करत असून,सर्व नियोजन पूर्ण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी राज्यभरातील संघटनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते,तसेच सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,उद्योग, शेतकरी आणि विविध क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अधिवेशन यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.
Comments are closed.