NGN News
Latest Marathi News

पायाभूत सुविधांच्या बळावर नाशिक बनेल प्रमुख गुंतवणुक केंद्र

  • कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांचा विश्वास
  • निमा सभागृहात उद्योग क्षेत्रासोबत महत्त्वपूर्ण बैठक

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असलेला पायाभूत सुविधांचा विकास शहराच्या औद्योगिक आणि आर्थिक प्रगतीसाठी निर्णायक ठरणार आहे. एक्स्प्रेसवे, रिंग रोड, वीज, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, वाहतूक आणि डिजिटल कनेक्टिव्हिटी या क्षेत्रांमध्ये होत असलेल्या विकासकामांमुळे नाशिक आगामी काळात देशातील महत्त्वाचे गुंतवणूक व औद्योगिक विकासाचे केंद्र बनेल, असा विश्वास कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केला.

नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या (निमा) सभागृहात उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी निमाचे अध्यक्ष आशिष नहार, उपाध्यक्ष मनीष रावल व किशोर राठी, सचिव राजेंद्र अहिरे, कोषाध्यक्ष राजेंद्र वडनेरे, संतोष मंडलेचा आदी उपस्थित होते.

शेखर सिंह म्हणाले, “कुंभमेळ्याच्या निमित्ताने उभारल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधा केवळ कुंभमेळ्यापुरत्या मर्यादित न राहता पुढील १५ ते २० वर्षांचा विचार करून विकसित करणे आवश्यक आहे. प्रशासन, उद्योग क्षेत्र आणि नागरिक यांच्या समन्वयातून नाशिकचा शाश्वत आणि सर्वसमावेशक विकास साधता येईल.”

रिंग रोडमुळे औद्योगिक विकासाला वेग

रिंग रोडचे काम कुंभमेळ्यापूर्वी पूर्ण झाल्यास शहरातील वाहतूक कोंडी व प्रदूषण कमी होण्यासोबतच मालवाहतूक अधिक सुलभ होईल. रिंग रोडलगतच्या परिसराचा नियोजनबद्ध विकास करताना आयटी, ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स (GCC) आणि एमएसएमई क्षेत्रासाठी विशेष झोन विकसित करण्याचा विचार आगामी विकास आराखड्यात करणे आवश्यक असल्याचे शेखर सिंह यांनी नमूद केले.

औद्योगिक विकासासाठी आवश्यक वीज पायाभूत सुविधांमध्येही मोठी वाढ होत आहे. ४०० केव्हीचे एक, २२० केव्हीची दोन आणि १३२ केव्हीची चार उपकेंद्रे उभारण्यात आली असून, त्यातून सुमारे १,६०० ते २,००० एमव्हीए क्षमतेची वीज उपलब्धता निर्माण होण्यास मदत होणार आहे. सातत्याने उत्पादन करणाऱ्या उद्योगांना अखंडित वीजपुरवठा मिळण्यासाठी पर्यायी वीजमार्ग आणि तांत्रिक उपाययोजनांचाही अभ्यास करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

सांडपाणी व्यवस्थापनाला प्राधान्य

नाशिकच्या भविष्यातील विकासात सांडपाणी व्यवस्थापनाला विशेष प्राधान्य देण्यात येत आहे. ४६ एमएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पूर्णत्वाकडे असून, पुढील १५ ते २० वर्षांच्या गरजा लक्षात घेऊन प्रक्रिया क्षमता वाढविण्याचे नियोजन आहे. सुमारे ३८५ किलोमीटरचे सांडपाणी वाहिनीचे जाळे विकसित केले जात आहे.

नदी प्रदूषण रोखण्यासाठी उद्योगांनीही पर्यावरणीय नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले. औद्योगिक विकासासोबतच पर्यावरण संवर्धनालाही समान महत्त्व देणे आवश्यक असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

रस्ते, पाणीपुरवठा आणि डिजिटल सुविधांवर भर

शहरातील सुमारे २० प्रमुख रस्त्यांच्या नूतनीकरणाची कामे सुरू असून, जुन्या पाणीपुरवठा वाहिन्यांचे टप्प्याटप्प्याने नूतनीकरण करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. त्याचबरोबर ऑप्टिकल फायबर, सीसीटीव्ही, कमांड सेंटर आणि इतर डिजिटल सुविधांसाठी सक्षम नेटवर्क उभारण्यावरही भर देण्यात येत आहे.

रस्त्यांच्या कडेला वृक्षारोपण, लँडस्केपिंग आणि सुशोभीकरणासाठी सार्वजनिक-खासगी सहभागातून (PPP) प्रकल्प राबविता येतील. उद्योगांच्या सहभागातून शहराचे सौंदर्यीकरण तसेच नागरी सुविधा अधिक सक्षम करता येतील, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

विकासकामासाठी उद्योग क्षेत्र तयार – नहार

निमाचे अध्यक्ष आशिष नहार म्हणाले, “नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी मजबूत पायाभूत सुविधा ही काळाची गरज आहे. आगामी कुंभमेळ्याच्या निमित्ताने शहरात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांची कामे होत आहेत. हे काम नाशिकच्या उद्योग क्षेत्राला मिळाले पाहिजे, अशी मागणी नहार यांनी केली.

“रिंग रोड, रस्ते, वीज, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन आणि दळणवळणाच्या सुविधांचा विकास झाल्यास नाशिकमध्ये नवीन उद्योग व गुंतवणूक आकर्षित करण्यास मोठी मदत होईल. रिंग रोडलगत उद्योगांसाठी नियोजनबद्ध झोन निर्माण केल्यास औद्योगिक विस्तारासोबत रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होतील,” असे नहार यांनी सांगितले.

“प्रशासन, उद्योग आणि नागरिकांनी एकत्रितपणे काम केल्यास नाशिकचा विकास अधिक वेगाने आणि शाश्वत पद्धतीने साधता येईल. नाशिकला देशाच्या औद्योगिक नकाशावर आणखी भक्कम स्थान मिळवून देण्यासाठी निमा प्रशासनासोबत पूर्ण सहकार्य करेल,” अशी ग्वाही नहार यांनी दिली.

याप्रसंगी निमा कार्यकारिणी सदस्य व उद्योजकांनी सिंहस्थ कुंभमेळा कामाविषयी सविस्तर चर्चा केली.

Comments are closed.