- आजी-आजोबांचा विविध उपक्रमांत उत्स्फूर्त सहभाग; प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन गौरव
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : नुकत्याच झालेल्या ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून राणेनगर येथील सेंट फ्रान्सिस हायस्कूलमध्ये आजी-आजोबा दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. संस्थापक डॉ. ऑगस्टीन पिंटो व संस्थापिका डॉ. ग्रेस पिंटो यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाला आजी-आजोबांची लक्षणीय उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात प्रभू येशूच्या प्रार्थनेने झाली. त्यानंतर पवित्र बायबलमधील वचनांचे पठण करण्यात आले. इयत्ता चौथी व पाचवीच्या विद्यार्थ्यांनी सुरेल प्रार्थनागीते सादर करून वातावरण भक्तिमय केले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून साहेबराव अर्जुन महाजन उपस्थित होते. विद्यार्थी प्रतिनिधींनी मान्यवर अतिथींचा परिचय करून देत त्यांचा रोपटे व शुभेच्छापत्र देऊन सन्मान केला. यानंतर उपस्थित आजी-आजोबांचे फुले व शुभेच्छापत्र देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. आजी-आजोबांसाठी विविध मनोरंजक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये आजी-आजोबांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विजेत्यांना प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथींनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात आजी-आजोबांनी नातवंडांसाठी वेळ द्यावा, त्यांच्याशी संवाद साधावा आणि वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करावे, असे आवाहन केले. तसेच नातवंडांनीही आजी-आजोबांप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांच्या अनुभवांचा आणि प्रेमाचा आदर करावा, असे सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका मंजू पाटील, विभागप्रमुख शितल चिंचोलीकर, प्राथमिक विभागप्रमुख उषा शेट्टी यांच्यासह शिक्षकवृंदाने विशेष परिश्रम घेतले.
Comments are closed.