NGN News
Latest Marathi News

बाळाच्या पोटात होते अर्भक; ‘एसएमबीटी’ त दुर्मिळ शस्त्रक्रिया

  • पाच लाख जन्मामागे आढळते अशी विसंगती; शस्रक्रिया विभागाच्या टीमचे सर्वदूर कौतुक

नाशिक | एनजीएन न्यूज नेटवर्क

वैद्यकीय क्षेत्रात अत्यंत दुर्मिळ मानली जाणारी ‘फिटस इन फिटू’ (Fetus in fetu) ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात डॉक्टरांना यश आले आहे. बालरोग शस्त्रक्रिया तज्ञ डॉ. अंजली चितळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने एका चिमुरड्याच्या पोटातील अविकसित अर्भकाचे अवशेष यशस्वीरित्या बाहेर काढून त्याला जीवदान दिले. जगभरात अशा प्रकारच्या अत्यंत मोजक्या केसेसची नोंद असून, या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे वैद्यकीय वर्तुळासह सर्व स्तरातून या कामगिरीचे कौतुक होत आहे.

अधिक माहिती अशी की, एका बालकाला पोट फुगणे, सतत होणाऱ्या उलट्या आणि दूध न पचणे अशा तक्रारींमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्राथमिक तपासणीत पोटात मोठी गाठ असल्याचे दिसून आले, मात्र सखोल रेडिओलॉजिकल चाचणीत या बाळाच्या पोटातील रेट्रोपेरिटोनियम भागात एका दुसऱ्या अविकसित मानवी अर्भकाचे अवशेष असल्याचे निदान झाले. ही शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची होती, कारण त्या अर्भकाचा रक्तपुरवठा मुख्य बाळाच्या रक्तवाहिन्यांशी जोडलेला होता. एसएमबीटी हॉस्पिटलच्या तज्ञांनी कौशल्याने बाळाच्या महत्त्वाच्या अवयवांना कोणताही धक्का न लावता हे अवशेष वेगळे केले. बाहेर काढलेल्या अवशेषांमध्ये पाठीचा कणा आणि हात-पायांची प्राथमिक रचना विकसित झाल्याचे दिसून आले होते.

त्या म्हणाल्या, ‘फिटस इन फिटू’ ही स्थिती अत्यंत दुर्मिळ श्रेणीत येते. जागतिक आकडेवारीनुसार, दर ५ लाख जिवंत जन्मांमागे केवळ एका बालकात ही विसंगती आढळू शकते. १८ व्या शतकात पहिल्यांदा या स्थितीचे वर्णन झाले असून, आतापर्यंत संपूर्ण जगभरात अशा केवळ २०० पेक्षा कमी केसेसची अधिकृत नोंद झाली आहे. यामुळेच प्रत्येक केस ही वैद्यकीय संशोधनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

या स्थितीच्या कारणांबाबत वैद्यकीय क्षेत्रात दोन मुख्य प्रवाह आहेत. सर्वात मान्य सिद्धांतानुसार, जेव्हा आईच्या गर्भात एकाच बिजांडापासून दोन जुळी मुले (Monochorionic Diamniotic Twins) वाढू लागतात, तेव्हा पेशींच्या असमान विभाजनामुळे एक गर्भ दुसऱ्या गर्भाच्या शरीरात पूर्णपणे सामावला जातो. याला ‘पॅरासिटिक ट्विन’ किंवा परजीवी जुळे असेही म्हणतात. दुसरा सिद्धांत याला ‘टेराटोमा’ (एक प्रकारची गाठ) मानतो, परंतु पाठीचा कणा आणि अवयवांची निर्मिती ही केवळ गर्भावस्थेतील विसंगतीमुळेच शक्य असल्याने पहिला सिद्धांत अधिक ग्राह्य धरला जातो.

ही शस्रक्रिया यशस्वी पार पाडण्यासाठी डॉ. प्रखर नागर, डॉ. अनुप्रित सातपुते, डॉ. सविनय पाटील, डॉ. अनुज रंगम, डॉ अश्रित राळे, डॉ दिव्या सिंग, डॉ प्रियांका खर्डे यांच्यासह बालरोग, भूलतज्ञ, रेडीओलॉजी आणि पथोलॉजी विभागातील सर्व तज्ञांनी मेहनत घेतली. या सर्वांचे एसएमबीटी प्रशासनाकडून कौतुक आणि अभिनंदन करण्यात आले.

पालकांनी काय काळजी घ्यावी?
अशा केसेसमध्ये अनेकदा जन्मानंतर लगेच लक्षणे दिसत नाहीत. बाळाचे पोट असामान्यपणे फुगलेले दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. दूध पिण्यास त्रास होणे किंवा वारंवार उलट्या होणे अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. गर्भावस्थेदरम्यान नियमित ‘अँटी-नेटल’ सोनोग्राफी (ANC Scan) करणे अनिवार्य आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे गर्भात असतानाच अशा विसंगतींचे निदान होऊ शकते, ज्यामुळे जन्मानंतर तातडीने उपचार करणे सोपे जाते.

गुंतागुंतीच्या शस्रक्रिया आणि यशस्वी उपचार हीच ओळख
एसएमबीटी हॉस्पिटलच्या अनुभवी नेतृत्वाखालील तज्ज्ञ शल्यचिकित्सक, कुशल भूलतज्ज्ञ आणि अहोरात्र सेवा देणारा प्रशिक्षित नर्सिंग व सपोर्टिंग स्टाफ यामुळेच अशा ‘हाय-रिस्क’ केसेसमध्ये उत्तम यश मिळवणे शक्य झाले. अचूक निदानासाठी आवश्यक असलेले अत्याधुनिक सीटी स्कॅन, एमआरआय आणि जागतिक दर्जाचे ऑपरेशन थियेटर्स यांसारखी सर्व आधुनिक साधनसामग्री येथे एकाच छताखाली उपलब्ध आहे.
सचिन बोरसे,
संचालक, आरोग्यसेवा
एसएमबीटी सेवाभावी ट्रस्ट

आजाराचे अचूक निदान महत्वाचे
सामान्य रुग्णालयांमध्ये ज्या केसेस हाताळणे कठीण असते, अशा गुंतागुंतीच्या आणि दुर्मिळ वैद्यकीय केसेस यशस्वीरित्या सोडवणे ही एसएमबीटी (SMBT) रुग्णालयाची ओळख आहे. ‘फिटस इन फिटू’ सारख्या जगात ५ लाख जन्मांमागे एकदा आढळणाऱ्या प्रकरणांपासून ते क्लिष्ट जन्मजात दोष आणि मोठ्या ट्यूमरच्या शस्त्रक्रियांपर्यंतची सर्व आव्हाने येथील डॉक्टरांनी यशस्वीरित्या पेलली आहेत. ही शस्त्रक्रिया आमच्यासाठी एक मोठे आव्हान होते, कारण अशा प्रकरणांत अचूक निदान होणे महत्त्वाचे असते. शस्त्रक्रियेनंतर बाळ आता पूर्णपणे सुखरूप असून त्याची प्रकृती सुधारत आहे.
डॉ. अंजली चितळे
बालरोग शस्रक्रिया तज्ञ
एसएमबीटी हॉस्पिटल

Comments are closed.