- हलकी रचना, फोर-व्हील ड्राइव्ह आणि रस्त्यावरून सहज वाहतूक करता येणारा नवा हार्वेस्टर; लहान शेतांपर्यंत पोहोचणे सोपे, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत
मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क
जगातील सर्वाधिक ट्रॅक्टर उत्पादन करणाऱ्या आणि भारतातील शेतीसाठी लागणारी यंत्रे तयार करणाऱ्या आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या ‘महिंद्रा अँड महिंद्रा’ने नवी कॉम्पॅक्ट हार्वेस्टर मशीन ‘महिंद्रा हार्वेस्ट युवा’ बाजारात आणली आहे. अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी ही मशीन तयार करण्यात आली आहे. अरुंद रस्त्यांमुळे जिथे मोठ्या हार्वेस्टर मशीन नेणे शक्य होत नाही, अशा ठिकाणी ही मशीन उपयुक्त ठरेल.
‘महिंद्रा हार्वेस्ट युवा’ची किंमत परवडणारी आहे. ही मशीन वेगवेगळ्या गरजांनुसार वापरता येते. ती चालवणे आणि देखभाल करणेही सोपे आहे. आकाराने लहान आणि वजनाने हलकी असल्याने ती सहज हाताळता येते. तसेच, विविध पिकांची कापणी करण्याच्या दृष्टीने तिची रचना करण्यात आली आहे. अर्धवट ओलसर आणि कोरड्या जमिनीत घेतल्या जाणाऱ्या भात, गहू, सोयाबीन आणि मका यांसारख्या पिकांची कापणीही या मशीनद्वारे करता येते.
मोठ्या आकाराच्या काही स्वयं-चलित हार्वेस्टरच्या तुलनेत ‘महिंद्रा हार्वेस्ट युवा’ची किंमत २५ टक्क्यांपर्यंत म्हणजेच ७ लाख रुपयांपर्यंत कमी आहे. त्यामुळे अल्प आणि मध्यम जमीनधारक शेतकऱ्यांना तसेच ग्रामीण भागात हार्वेस्टर भाड्याने देणाऱ्या व्यावसायिकांना हे मशीन परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध होईल. लहान शेतांमध्ये यांत्रिक पद्धतीने कापणी करण्यासाठी हा हार्वेस्टर परवडणारा पर्याय आहे. हाताने कापणी करण्याच्या तुलनेत या मशीनमुळे काम जलद होते. त्यामुळे कमी वेळेत अधिक कापणी करता येते आणि उत्पादकताही वाढते.
‘महिंद्रा हार्वेस्ट युवा’मुळे अल्प आणि मध्यम आकाराच्या शेतांमधील कापणीचे काम कमी वेळेत आणि चांगल्या प्रकारे करता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत कापणी पूर्ण करता येईल. हवामानामुळे होणारे नुकसान कमी होईल. तसेच, त्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. या नव्या मशीनबद्दल बोलताना ‘महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड’च्या फार्म इक्विपमेंट बिझनेस, फार्म मशिनरी विभागाचे उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख रवींद्र शहाणे म्हणाले, “अल्प आणि मध्यम भूधारक शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन ‘महिंद्रा हार्वेस्ट युवा’ची सुरुवातीपासूनच रचना करण्यात आली आहे. आकाराने लहान असल्याने या मशीनची वाहतूक रस्त्यावरून सहज करता येते. ती चालवणेही सोपे आहे. कापणीचे कामही ती कमी वेळेत आणि चांगल्या प्रकारे करते. त्यामुळे मोठ्या मशीन पोहोचू शकत नाहीत, अशा दुर्गम भागांमध्येही शेतकऱ्यांना यांत्रिक पद्धतीने कापणी करता येईल. परवडणारी किंमत, अधिक उत्पादकता आणि विश्वासार्हता या वैशिष्ट्यांमुळे ‘हार्वेस्ट युवा’ शेतकरी आणि ग्रामीण उद्योजकांसाठी उपयुक्त ठरेल. या मशीनमुळे काम अधिक चांगल्या प्रकारे करता येईल आणि शेतीचा खर्च व उत्पन्न यांचे गणित सुधारण्यास मदत होईल.”
ऑपरेटरच्या सोयीचा विचार करून ‘महिंद्रा हार्वेस्ट युवा’ची रचना करण्यात आली आहे. हे मशीन चालवणे सोपे व्हावे, यासाठी त्यात अनेक सोयीस्कर वैशिष्ट्ये दिली आहेत.
ऑपरेटरला बसण्यासाठी कमी उंचीची जागा.
सहकारी ऑपरेटरसाठी स्वतंत्र सीट असलेला प्रशस्त प्लॅटफॉर्म.
मशीनचे काम सुरळीत सुरू राहावे यासाठी सेल्फ-क्लीनिंग रेडिएटर.
इंजिन मागील बाजूस बसवले असल्यामुळे इंजिनची उष्णता ऑपरेटरपर्यंत पोहोचत
नाही. परिणामी, दीर्घकाळ काम करताना ऑपरेटरला थेट उष्णतेचा त्रास कमी होतो.
‘महिंद्रा हार्वेस्ट युवा’मध्ये आरटीओची मान्यता असलेला ९.३ आणि १०.९ फूट रुंदीचा कटर बार दिला आहे. तसेच, बंद प्रकारची अनलोडिंग ट्यूब आहे. मशीनची रचना निमुळती असून ट्रॅकची रुंदी फक्त ८ फूट आहे. त्यामुळे गावातील अरुंद रस्त्यांवरून आणि लहान वळणांवरून हे मशीन सहज नेता येते. मशीनमध्ये फोर-व्हील ड्राइव्हची सुविधा आहे. त्यामुळे ओलसर भातशेती आणि सोयाबीनच्या शेतात काम करताना चाकांना चांगली पकड मिळते. कटर बारची रचना कॉम्पॅक्ट असल्याने एका शेतातून दुसऱ्या शेतात जाताना तो काढण्याची आणि पुन्हा बसवण्याची गरज पडत नाही. शेतातील अरुंद प्रवेशमार्गातून जातानाही तो काढावा लागत नाही. तसेच, रस्त्यावरून शेतात जातानाही तो जागेवरच ठेवता येतो. कटर बारचा पुढील भाग ऑपरेटरला स्पष्ट दिसतो. त्यामुळे कापणी योग्य दिशेने करता येते आणि पीक अधिक अचूकपणे कापले जाते. यामुळे पिकांचे नुकसान कमी होते. विशेषतः जमिनीवर पडलेल्या किंवा असमान उंचीवर वाढलेल्या पिकांची कापणी करताना याचा फायदा होतो. हायड्रॉलिक रील ॲडजस्टर आणि प्रॉन्ग कटरमुळे वेगवेगळ्या उंचीची आणि घनतेची पिके कापणे सोपे होते. तसेच, वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनी आणि पिकांनुसार मशीनमध्ये बदल करता येतात. या हार्वेस्टरमध्ये फीडर रिव्हर्सरची खास सुविधा आहे. त्यामुळे ऑपरेटरच्या जागेवरूनच एक लीव्हर दाबून मशीनमध्ये अडकलेला कचरा किंवा पीक सहज बाहेर काढता येते.
हलकी चेनवर चालणारी यंत्रणा आणि पुढील व मागील चाके एकाच रेषेत असलेली रचना यामुळे जमिनीवर कमी दाब पडतो. त्यामुळे जमीन कमी घट्ट होते. या रचनेमुळे मशीनचा वेग आणि चपळता वाढते. कापणीचे काम अधिक कार्यक्षमतेने होते आणि पिकांचे नुकसान कमी होते. बाजारात विक्रीसाठी पाठवल्या जाणाऱ्या शेतमालाचा दर्जाही चांगला राहतो. ‘महिंद्रा’च्या विश्वासार्ह इंजिन तंत्रज्ञानावर आधारित ‘महिंद्रा हार्वेस्ट युवा’ दीर्घकाळ काम करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. हे मशीन अधिक काळ विनाअडथळा चालते. त्याची सर्व्हिसिंगही सोपी आहे. त्यामुळे दुरुस्तीसाठी मशीन बंद ठेवण्याचा वेळ कमी होतो. या हार्वेस्टरवर ‘महिंद्रा’कडून १ वर्षाची वॉरंटी देण्यात आली आहे. नवा ‘महिंद्रा हार्वेस्ट युवा’ हार्वेस्टर महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि उत्तर प्रदेशातील प्रमुख बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.
Comments are closed.