NGN News
Latest Marathi News

सप्तशृंगी गडावर तुडुंब गर्दी; वाहतुकीचा बोजवारा, नियोजन कोलमडले

  • पार्किंगचा ठणठणाट! दुर्घटनेची प्रशासनाला प्रतीक्षा आहे का?
  • दीड-दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा; रुग्णवाहिकेलाही मार्ग मिळेना! ट्रॅव्हलर्स, खासगी बसेस, ट्रॅक्टर अन् रिक्षांचा रस्त्यांवर कब्जा; नांदुरीच्या पोलीस चौकीतून नियंत्रण कुठे? दोन पार्किंगच्या भरवशावर लाखो भाविकांची सुरक्षितता वाऱ्यावर!

** एनजीएन न्यूज नेटवर्क

सप्तशृंगगड : रघुवीर जोशी

सप्तशृंगगडावर आई सप्तशृंगीच्या दर्शनासाठी भाविकांचा जनसागर उसळत असताना वाहतूक आणि पार्किंग व्यवस्थेचा मात्र पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र दिसत आहे. दीड ते दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा, रस्त्यांवर ट्रॅव्हलर्स, खासगी बसेस, ट्रॅक्टर आणि रिक्षांची गर्दी, तर भाविकांना करावी लागणारी पायपीट यामुळे प्रशासनाच्या नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भक्तीचा महापूर गडावर उसळतोय; मात्र प्रशासनाचा कारभार अद्यापही देवीच्या भरोशावरच सुरू आहे का, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

रस्ते भाविकांसाठी की वाहनांच्या पार्किंगसाठी?

गडावरील रस्त्यांवर मोठ्या वाहनांचा विळखा पडत असून, अनेक ठिकाणी वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. वाहनांच्या गर्दीमुळे भाविकांना दूरवर उतरून दीड-दोन किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. विशेष म्हणजे, वाहतूक कोंडी इतकी वाढते की रुग्णवाहिकेलाही मार्ग काढताना अडचणी निर्माण होण्याची परिस्थिती आहे. आपत्कालीन प्रसंगी रुग्णवाहिकेसाठी स्वतंत्र मार्ग नसेल, तर गंभीर घटना घडल्यास जबाबदारी कोण घेणार?

नांदुरीच्या पोलीस चौकीतून नियंत्रण नेमके कुठे?

गडाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या नांदुरी पोलीस चौकीतून वाहनांच्या प्रवेशावर नियंत्रण, तपासणी आणि वाहतूक नियोजन प्रभावीपणे होणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात वाहनांच्या रांगा दीड-दोन किलोमीटरपर्यंत पोहोचल्यानंतरच पोलीस यंत्रणा सतर्क होत असल्याचे चित्र दिसते. मग गर्दी वाढण्यापूर्वीच नियंत्रण का ठेवले जात नाही? खासगी व्यावसायिकांकडून रस्त्यालगत वाहने उभी करण्यास सांगितले जात असताना पोलीस प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष का?

दोन पार्किंगच्या भरवशावर लाखो भाविक!

शिवालय तलाव परिसर आणि रोपवे येथील दोन प्रमुख पार्किंग व्यवस्थांवर लाखो भाविकांच्या वाहनांचा भार कसा पेलणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे. पार्किंग भरल्यानंतर वाहनांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याऐवजी रस्त्यांवरच वाहनांची गर्दी वाढत असल्याचे दिसते. रोपवे परिसरातही वाहनांचा विळखा कायम असून पायी जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरवर्षी तीच समस्या; कायमस्वरूपी उपाय कधी?

यात्रा, सण आणि सुट्ट्यांच्या काळात गडावर मोठी गर्दी होणार, हे प्रशासनाला माहीत असतानाही दरवर्षी तीच वाहतूक कोंडी आणि पार्किंगचा प्रश्न कायम आहे. नांदुरीपासून गडापर्यंत कायमस्वरूपी वाहतूक आराखडा, अतिरिक्त पार्किंग, वाहनांच्या प्रवेशावर नियंत्रण, आवश्यकतेनुसार शटल सेवा, स्वतंत्र पादचारी मार्ग आणि रुग्णवाहिकेसाठी मोकळा आपत्कालीन मार्ग उपलब्ध करणे गरजेचे आहे.

आई सप्तशृंगीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी रोखता येणार नाही; मात्र त्या गर्दीला शिस्त लावणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. दुर्घटना घडल्यानंतर चौकशी आणि जबाबदारी निश्चित करण्यापेक्षा त्याआधीच ठोस उपाययोजना करा! प्रशासनाला भाविकांच्या सुरक्षिततेची काळजी आहे की एखाद्या मोठ्या दुर्घटनेची प्रतीक्षा आहे? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

Comments are closed.