- राज्यपाल, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, तेरा आखाड्यांचे प्रमुख महंत, साधू-महंत यांची विशेष उपस्थिती
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ऐतिहासिक पर्वाचा शुभारंभ उद्या (शनिवार, ३१ ऑक्टोबर) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वरमध्ये प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, ध्वजारोहण सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. श्रीरामकुंड, गोदाघाट आणि कुशावर्त तीर्थ परिसराला विशेष सजावट करण्यात आली आहे. सुरक्षा, वाहतूक, स्वच्छता आणि गर्दी व्यवस्थापनासाठी विविध विभागांनी कंबर कसली आहे.
दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी ध्वजारोहणाचा मुहूर्त
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या प्रारंभाचा महत्त्वपूर्ण धार्मिक सोहळा शनिवारी पार पडणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी श्रीरामकुंड परिसरात ध्वजारोहण होणार आहे. या सोहळ्याला राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तेरा आखाड्यांचे प्रमुख महंत, साधू-महंत, धार्मिक संस्थांचे प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांचीही उपस्थिती अपेक्षित आहे.
रामकुंड आणि गोदाघाट परिसर सजले
ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रामकुंड परिसरात भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. ध्वजस्तंभ, विद्युत रोषणाई, आकर्षक सजावट, बैठक व्यवस्था आणि प्रवेशद्वारांची कामे पूर्णत्वाकडे गेली आहेत. गोदाघाट परिसरातही स्वच्छता आणि सुशोभीकरणावर विशेष भर देण्यात आला आहे. ध्वजारोहणासोबतच सायंकाळी सात वाजता गोदावरी महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. या आरतीसाठीही स्वतंत्र व्यासपीठ आणि सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली आहे. गोदाघाटावर दीपप्रज्वलनामुळे भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; आयबी, एनएसजी, एटीएस तैनात
राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली आहे. रामकुंड, पंचवटी, गोदाघाट आणि जुन्या नाशिक परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. स्थानिक पोलिसांसह गुप्तचर यंत्रणा, एनएसजी आणि एटीएसची पथके सुरक्षेच्या दृष्टीने कार्यरत आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून परिसरावर लक्ष ठेवण्यात येत आहे. गर्दी नियंत्रण, मान्यवरांची सुरक्षा, प्रवेश आणि निर्गमन व्यवस्था यांचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.
वाहतुकीत मोठे बदल; वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग
ध्वजारोहण आणि गोदावरी महाआरतीच्या पार्श्वभूमीवर ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी शहरातील अनेक मार्गांवर वाहतूक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. रामकुंड, रविवार कारंजा, पंचवटी, मालेगाव स्टँड, नेहरू चौक, गोदाघाट आणि परिसरातील काही रस्त्यांवर वाहनांना प्रवेश बंद ठेवण्यात येणार आहे. पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली असून, वाहनचालकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सिंहस्थाच्या पर्वाला मिळणार अधिकृत प्रारंभ
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर ही धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेची महत्त्वाची केंद्रे आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होणारा हा ध्वजारोहण सोहळा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. देशभरातील साधू-संत, भाविक आणि धार्मिक संस्थांचे लक्ष या सोहळ्याकडे लागले आहे.
राष्ट्रपतींच्या उपस्थितीमुळे या सोहळ्याला राष्ट्रीय स्तरावर विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे. उद्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने नाशिकच्या धार्मिक परंपरेचे आणि सांस्कृतिक वैभवाचे दर्शन देशाला घडणार आहे.
Comments are closed.