
- महिलेची साडेसात लाखांची फसवणूक; अंनिसच्या पाठपुराव्याला यश; गंगापूर पोलिसांत भोंदू अरुण पाटीलविरुद्ध गुन्हा दाखल
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : आजार बरा करण्यासह दैवी आणि अघोरी शक्तींच्या माध्यमातून पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून पनवेल येथील एका महिलेला साडेसात लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात महिलेला अर्धनग्न अवस्थेत बसवून अघोरी पूजाविधी करण्यात आल्याचा आरोप आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) कार्यकर्त्यांनी पाठपुरावा केल्यानंतर गंगापूर पोलिसांनी नाशिकमधील अरुण धोंडू पाटील याच्याविरुद्ध जादूटोणाविरोधी कायदा आणि भारतीय न्याय संहितेतील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे.
आजार बरा झाल्याचा भास निर्माण करून विश्वास संपादन
मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल येथील अस्थमाने त्रस्त असलेल्या महिलेला गंगापूर शिवारातील अरुण पाटील याच्या कथित दैवी शक्तींबाबत माहिती मिळाली होती. त्याने महिलेला आणण्यासाठी पनवेलला वाहन पाठवले. त्यानंतर महिलेला आणि तिच्या पतीला डोळ्यांवर काळी पट्टी बांधून नाशिकला आणण्यात आले. पूजाविधीनंतर पुन्हा त्याच पद्धतीने त्यांना पनवेलला सोडण्यात आले. अशा प्रकारे दोन वेळा विधी करण्यात आले. आजारात सुधारणा झाल्याचा भास निर्माण झाल्याने महिलेचा त्याच्यावर विश्वास बसला.
मानवी कवटी, रक्तमाखलेले कपडे आणि बोकडाचा बळी
यानंतर पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून संबंधित महिलेच्या मासिक पाळीतील रक्ताने माखलेले कपडे आणण्यास सांगण्यात आले. तिला पुन्हा डोळ्यांवर पट्टी बांधून गंगापूर रोडवरील बालाजी मंदिर परिसरात आणण्यात आले. तेथे तिच्या अंगावरील कपडे काढून तिला पांढरे, पारदर्शक पातळ वस्त्र नेसवण्यात आल्याचा आरोप आहे. पाणी, मानवी कवटी, तांदूळ, हळद, कुंकू, गुलालाचे पाणी आणि बुक्का आदींचा वापर करून सुमारे दोन तास अघोरी पूजाविधी करण्यात आला. या विधीसाठी महिलेने दिलेल्या पाच लाख रुपयांची पूजा करण्यात आली, तसेच बोकडाचा बळी देण्यात आला. घरी गेल्यानंतर पैशाचा पाऊस पडेल, असे सांगून पुन्हा त्यांना डोळ्यांवर पट्टी बांधून पनवेलला पोहोचवण्यात आले.
फसवणूक लक्षात येताच अंनिसकडे धाव
तीन पूजाविधींसाठी संबंधित भोंदूने महिलेकडून एकूण साडेसात लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. मात्र, ना पैशाचा पाऊस पडला, ना महिलेचा आजार दूर झाला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने पैसे परत मागितले; परंतु तिला टाळाटाळ करणारी उत्तरे मिळाली. यानंतर महाराष्ट्र अंनिसच्या नाशिकमधील कार्यकर्त्यांना या प्रकाराची माहिती मिळाली. त्यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेऊन प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांच्या माध्यमातून संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
इतर पीडितांनाही तक्रारीचे आवाहन
दैवी किंवा अघोरी शक्ती, मंत्र-तंत्र आणि पूजाविधींच्या माध्यमातून पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून या व्यक्तीने अन्य कोणाची फसवणूक केली असल्यास त्यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी, असे आवाहन पोलिसांसह महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांनी केले आहे. या प्रकरणात महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे, राज्य सदस्य कृष्णा चांदगुडे, प्रल्हाद मिस्तरी, महेंद्र दातरंगे, रंजन लोंढे, कोमल वर्दे आणि डॉ. मंगेश कादे यांनी प्रयत्न केले.
Comments are closed.