NGN News
Latest Marathi News

विकासकामांच्या ठिकाणी नागरिक सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या : आ. सीमाताई हिरे

  • महापालिका आयुक्तांकडे मागणी; सुरक्षा अधिकारी, मजबूत बॅरिकेड्स आणि २४×७ हेल्पलाईन सुरू करण्याची सूचना

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : शहराचा सर्वांगीण विकास आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेली पायाभूत सुविधांची कामे करताना नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशी ठाम भूमिका आमदार सौ. सीमाताई महेश हिरे यांनी मांडली आहे. विकासकामांच्या ठिकाणी सुरक्षा मानकांचे काटेकोर पालन करणे, प्रभागनिहाय सुरक्षा अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे आणि नागरिकांसाठी २४ तास आपत्कालीन हेल्पलाईन सुरू करणे, या प्रमुख मागण्यांचे निवेदन त्यांनी महापालिका आयुक्तांना दिले.

रात्रीच्या वेळी अपघातांचा धोका
सिडको, सातपूर, पंचवटी, पश्चिम नाशिक आणि त्र्यंबक रोड परिसरात रस्त्यांचे काँक्रिटीकरण, रुंदीकरण तसेच भूमिगत सेवा वाहिन्यांची कामे सुरू आहेत. अनेक ठिकाणी खोदकामाच्या परिसरात लावलेले प्लास्टिकचे बॅरिकेड्स हलके किंवा अपुरे असल्याने ते रात्रीच्या वेळी वाहनचालकांना स्पष्टपणे दिसत नाहीत. त्यामुळे अपघातांचा धोका वाढत असून, नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होत असल्याबद्दल आमदार हिरे यांनी चिंता व्यक्त केली.

प्रशासनाकडे चार प्रमुख मागण्या :

१. प्रभागनिहाय सुरक्षा अधिकारी नेमा
प्रत्येक प्रभागातील सुरू असलेल्या विकासकामांवर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र सुरक्षा अधिकारी नियुक्त करावेत.
कंत्राटदारांकडून सुरक्षा साधनांचा वापर होतो की नाही, याची दररोज तपासणी करावी.
२. मजबूत आणि रिफ्लेक्टिव्ह बॅरिकेड्स बंधनकारक करा
खोदकामाच्या ठिकाणी मजबूत बॅरिकेड्स लावावेत.
रात्रीच्या वेळी दूरवरून स्पष्ट दिसणाऱ्या रिफ्लेक्टर, रेडियम पट्ट्या आणि ब्लिंकिंग लाईट्सचा वापर सक्तीचा करावा.
३. २४×७ टोल-फ्री व व्हॉट्सॲप हेल्पलाईन सुरू करा
असुरक्षित खोदकाम, तुटलेले बॅरिकेड्स किंवा सुरक्षेतील त्रुटींबाबत नागरिकांना फोटोसह तक्रार नोंदवता यावी.
तक्रार प्राप्त होताच महापालिकेच्या आपत्कालीन पथकाने घटनास्थळी पोहोचून तातडीने सुरक्षा व्यवस्था करावी.
४. विकासकामांच्या ठिकाणी माहिती फलक लावा
प्रत्येक मोठ्या कामाच्या ठिकाणी ‘आजची स्थिती आणि उद्याचे शहर’ या संकल्पनेवर आधारित माहिती फलक उभारावेत.
रस्त्याची सध्याची स्थिती आणि काम पूर्ण झाल्यानंतर होणारे बदल चित्रांच्या माध्यमातून दाखवावेत.
यामुळे नागरिकांना विकासकामांचे महत्त्व समजण्यास मदत होईल आणि प्रशासनावरील विश्वास वाढेल.

‘सुरक्षित नाशिक’ हीच विकासाची खरी कसोटी
“नाशिककरांचे जीवन सुरक्षित ठेवूनच शहराला आधुनिकतेकडे नेता येईल. विकासकामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे; मात्र त्यासाठी नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड होता कामा नये. प्रशासनाने या सर्व उपाययोजनांची युद्धपातळीवर अंमलबजावणी करावी,” असे आवाहन आमदार सौ. सीमाताई हिरे यांनी केले.

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांची कामे सुरू असताना, विकासासोबतच सुरक्षिततेची प्रभावी यंत्रणा उभारण्याची मागणी या निवेदनातून पुढे आली आहे.

Comments are closed.